Join us  

कमळाबाईच्या मराठी दांडियाने शिवसेना इंचभरही हलणार नाही; भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 7:44 AM

इथे मराठी लोकांमध्ये वितुष्टाचे दांडिये घुमवायचे तर दुसऱ्या बाजूला जैन संघटनांना पुढे करून शाकाहार, मांसाहार वादास नवी फोडणी द्यायची असा आरोप शिवसेनेने भाजपावर केला.

मुंबई - शिवसेना शिल्लक आहे म्हणून मऱ्हाठी शिल्लक आहे. हिंदुत्व बचावले आहे. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकविले. गर्वाने ‘मराठी’पणाची कवचकुंडले दिली, पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत. स्वकीयांशी लढणे हे महाराष्ट्राचे व मराठय़ांचे दुर्भाग्य काय आजचे आहे? मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे. शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपा आणि शिंदे गटाचा समाचार घेतला आहे. 

तसेच मुंबई महापालिकेवरील ‘भगवा झेंडा’ खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळे करायचे असे त्यांचे एकंदरीत धोरण आहे. शिवसेना म्हणजे मराठी एकजुटीची वज्रमूठ, हिंदुत्वाचा बुलंद हुंकार. वारे इकडे तिकडे कितीही फिरले तरी मराठी एकजुटीचे मन कधीच भरकटले नाही. गेल्या ५० वर्षांत कमळाबाईने हे असले ‘दांडिये’ प्रयोग भरपूर केले, पण त्यांना यश आले नाही असंही शिवसेनेने म्हटलं आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. 

मुंबईतील मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्या आमदारांची कमअस्सल अवलाद नाही. लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, दादर, भायखळा इतकेच काय, गिरगावपासून दहिसर-मुलुंडपर्यंतचा मुंबईतील प्रदेश सतत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला व त्यात मराठीजनांबरोबर हिंदी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम, दाक्षिणात्य असे ‘मुंबैकर’ बांधवही समर्थनार्थ उभे राहिले. हे भाजपच्या दांडियेकरांना इतक्या वर्षांत समजू नये काय? 

मुळात फक्त ‘दांडिये’ करून मुंबईवर शिवसेनेचे राज्य टिकले नाही. शिवसेनेने सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले. गरबा काय किंवा दांडिया काय, नवरात्रीतला एक पवित्र आणि सांस्कृतिक मनोमीलनचा सोहळा आहे. तरुण, आबालवृद्ध असे सगळेच त्यात सहभागी होतात. मात्र अशा पवित्र उत्सवातही राजकारणाच्या फोडाफोडीचे विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रावर दुहीची आफत आणत आहेत. 

काही दिवसांपूर्वी कमळाबाईच्या प्रेरणेने मुंबईत ‘मराठी कट्टा’ नामक एक अजब प्रकार सुरू झाला. त्याचे पुढे काय झाले हे कोणीच सांगू शकत नाही. मराठी कट्टे काय किंवा हे मराठी दांडिये काय शिवसेनेला विरोध करण्यासाठीच सगळे उपद्व्याप सुरू झाले आहेत. दिल्लीश्वरांना मुंबईवरून भगवा हटवायचाच आहे व त्यासाठी त्यांचे हे नवे नवे उद्योग सुरू झाले आहेत. 

इथे मराठी लोकांमध्ये वितुष्टाचे दांडिये घुमवायचे तर दुसऱ्या बाजूला जैन संघटनांना पुढे करून शाकाहार, मांसाहार वादास नवी फोडणी द्यायची. मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी काही जैन संघटना उच्च न्यायालयात गेल्या, पण तेथे न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. मांसाहारी खाद्य पदार्थांच्या जाहिराती पाहायच्या नसतील तर टी.व्ही. बंद करा असा फटका न्यायालयाने मारला. 

‘मांसाहारी खाद्य पदार्थांच्या जाहिरातीमध्ये पक्षी, प्राणीहत्येला प्रोत्साहन देण्यात येते. ग्राहकांना मांस पुरवठा करण्यासाठी मोठय़ा संख्येने प्राणी, पक्षी, सागरी जीवांना निर्दयपणे मारले जाते. मांस, मासे आदींशी संबंधित जाहिराती पाहणे हे जैन समाजाच्या आणि इतर शाकाहारी नागरिकांच्या धार्मिक भावना दुखविणारे व शांतता बिघडविणारे आहे’, असेही जैन याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. मात्र ते न्यायालयाने मान्य केले नाही. 

आता प्रश्न असा आहे की, आपले पंतप्रधान मोदी यांनी आठ मांसाहारी चित्ते नामीबियातून आणले व मध्य प्रदेशच्या जंगलात वाजत-गाजत सोडले. ते चित्ते काय जंगलात दही-खिचडी, तूप-रोटी खाणार आहेत? मोदींचे सरकार त्यांना चांगला मांसाहार पुरवत आहेत. हा काय मांसाहार, हिंसाचार नाही? 

भाजपशासित राज्यांत गोमांस भक्षणाचा महापूर आला आहे आणि इथे मुंबईतील अनेक भागांतील हाऊसिंग सोसायटय़ांत मांसाहारी मंडळींना ‘घर’बंदी आहे. मांसाहार करणाऱ्यांना घर आणि प्रवेश नाकारला जातो. मात्र या मांसाहार करणाऱ्यांनीच संकटांचे घाव झेलून मुंबईचे व त्यातील शाकाहारी व्यापार मंडळाचे रक्षण केले आहे. 

आम्ही मराठी म्हणून ते ‘मराठी दांडिया’चा खेळ करत बसले नाहीत, तर हिंदू म्हणून हातात शस्त्र घेऊन क्षत्रिय धर्मास जागले. आज मुंबईचा ताबा घेण्याचे मनसुबे जे रचत आहेत त्यांनी मुंबईसाठी काय केले, याचा हिशोब द्यावा.  

टॅग्स :शिवसेनाभाजपाएकनाथ शिंदे