Join us

Uddhav Thackeray Sabha: “हिंमत असेल तर महिनाभरात BMC आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा”; ठाकरेंचे शाहांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 9:24 PM

Uddhav Thackeray Sabha: एकट्या उद्धव ठाकरेंशी लढायला मोदी, शाह, भाजप आणि मुन्नाभाई एकत्र आलेत. पण तुमचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले. यावेळी शिंदे गट आणि भाजपवर खास ठाकरे शैलीत तोफ डागली. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण ते कोरोनापर्यंत अनेक मु्द्द्यांवरून जोरदार निशाणा साधला. तसेच हिंमत असेल तर महिनाभरात मुंबई महानगरपालिका आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा, असे खुले आव्हान अमित शाह यांना केले. 

शिवसेना संपवण्यासाठी हे सगळे आता एकमेकांच्या साथीने उभे राहिले आहेत. भाजपने मुन्नाभाईला सोबत घेतले आहे. गणेशोत्सवात अमित शाह आले होते. आता काहीतरी पंतप्रधान मोदी येणार आहे. या उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे मोदी, शाह, भाजप आणि आमचे गद्दार मुन्नाभाई एकत्र आले आहेत. यांना शिवसेना संपवायची आहे. उद्धव ठाकरेंना संपुष्टात आणायचे आहे. मात्र, तुम्ही असे होऊ देणार आहात का, अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले. 

मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा

शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचे हिंदुत्व कळतेय, मराठी-हिंदूंसोबत उत्तर भारतीय, गुजराती सर्व आमच्यासोबत आहेत. तुमचे चेले-चपाटे इकडे जे बसले आहेत त्यांना सांगा मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा आणि त्यासोबतच विधानसभेची निवडणूक लावून दाखवा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिले आहे.  उद्धव ठाकरे म्हणाले, मी अमित शाह ना आवाहन देतोय, तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाही. कुस्ती आम्हांलाही येते, तीच आमची परंपरा आहे. पाहू कोण कुणाच्या पाठीला माती लावतो, असे गर्जना उद्धव ठाकरेंनी केली. 

आयुष्यातील पहिली निवडणूक समजा

गद्दारांच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे. आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक समजा. आपल्याकडे काही नाही. नवीन भगवा लावायचाय. शिवसेनेची प्रत्येक शाखा म्हणजे विश्वास, हिंमत, विकास... शाखाप्रमुख, गटप्रमुख तेथे असलेच पाहिजेत. ढीगभर गद्दारांसोबत असण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत असले तर कशाची पर्वा नाही. प्रत्येकाच्या हृदयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील, शिवसैनिकांची नाही. वाटेला येण्याचा प्रयत्न करू नका, असे इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

दरम्यान, मध्यंतरी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ही माझी शेवटची निवडणूक. होय, फडणवीस ही तुमची शेवटचीच निवडणूक आहे. मात्र, शिवसैनिकांनो जे सोडून गेलेत, त्यांचा विचार करू नका. आपल्याला शुन्यापासून सुरुवात करायची आहे, हे इर्षेने निवडणुकीला सामोरे जा. आपल्याकडे काहीच नव्हते आणि आता पुन्हा एकदा सगळे उभे करायचे आहे, या भावनेने निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेभाजपा