मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले. यावेळी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर घणाघाती टीका करत कोरोना संकट काळात मुंबईसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचत मुंबई वाचवून दाखवली, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
कोरोना काळात जगातील अनेक देशांनी कोरोना लढण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. मातृभूमी असलेल्या आमच्या मुंबईला वाचवण्यासाठी अनेक गोष्टी प्रथम केल्या. धारावीसारख्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आणून दाखवला. शेकडो खाटाचे कोव्हिड सेंटर अवघ्या काही दिवसांत उभारले. मुंबईच्या मॉडेलचे कौतुक न्यायसंस्थांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरही करण्यात आले आहे. पण या भाजपवाले फक्त आणि फक्त टीकाच करत राहिले. मुंबईसाठी काम करण्यासाठी आणि मुंबईकरांसाठी शिवसैनिकच प्रथम धावून गेला. भाजपवाले नाही, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.
केंद्रातून अनेक गोष्टींसाठी दबाव आला
कोरोना काळात अनेक इतर गोष्टी करण्यासाठी दबाव आला. पण कोरोना आणि त्याच्या नियंत्रणासाठीच काही कठोर निर्णय घेतले. प्रसंगी त्याचा कटुपणा मी स्वतः घेतला. विरोधक म्हणाले घराच्या बाहेर पडले नाही, पण कोरोनातून वाचण्यासाठी मीच तसा सल्ला दिला होता. मुंबई कोरोनापासून वाचवली, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये वाईट अवस्था होती. तसे व्हायला नको होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, खोक्यांमधून आधी बाहेर या आणि मग भ्रष्टाचारावर बोला, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला. तसेच शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. संजय राऊतांवर बोलताना, सगळे मिंधे शिंदे गटात गेले आहेत. मात्र, संजय राऊत निष्ठेने लढत आहेत. मोडेन पण वाकणार नाही, हाच निश्चय त्यांचा आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी इथे राखीव खुर्ची ठेवलेली आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना नमूद केले.