Join us

"शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही..."; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ठणकावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 4:29 PM

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. शिवसेना, शिवसैनिक ठाम आहे असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले.

मुंबई - शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही कुणीही उचलावी आणि खिशात टाकावी. शिवसेनेला ५६ वर्ष झाली असे ५६ लोकं पाहिली. शिवसेना निष्ठावंतांच्या रक्तावर मोठी होणारी संघटना आहे गद्दारांच्या मेहनतीवर नाही. दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार, तो आमचाच होणार अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीएकनाथ शिंदेंना ठणकावलं आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार, तो आमचाच होणार. संभ्रम निर्माण करणाऱ्यांना संभ्रम निर्माण करू द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याला येण्याची तयारी केली आहे. कोण काही विधानं करत असेल ते मला माहिती नाही. शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यास येण्याची तयारी सुरू केली आहे. तांत्रिक, मांत्रिक भाग त्यांचा असेल. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. शिवसेना, शिवसैनिक ठाम आहे असं त्यांनी म्हटलं. 

शिवसेनेत येण्याचं आवाहनअनेक विषय आहेत, त्या विषयांवर मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. हिंदुत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपली फरफटत झाली. खरे हिंदुत्व शिवसेनेकडे आहे असं ज्यांना वाटतं त्यांना मातोश्रीचे, शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. केवळ शिवसेनेला भक्कम करण्यासाठी नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी आपण एकत्र यावेत असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारताच अरविंद सावंत खुर्चीवरून उठले; नेमकं काय घडलं?

राजकारणात हे नवीन नाही जे काँग्रेसमध्ये चाललं ते मीपण बघतोय, इकडे खूप आनंदीआनंद होता, त्या आनंदाचा कंटाळा आलाय म्हणून मी घर सोडतोय असं कुणीही बोलत नाही. आमच्याकडेही तेच झाले. गद्दारांना गद्दारी का केली ते कळत नाही. आज वेगळे, उद्या वेगळं बोललं जातंय. राजकारणात हे काही नवीन नाही हे होतच असते असं सांगत उद्धव ठाकरे यांनी गुलाब नबी आझाद यांच्या काँग्रेस सोडण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

महाराष्ट्रातील हे चित्र देशासाठी मार्गदर्शकशिवसेनेत रोजच प्रवेश होतायेत. मला अभिमान वाटतो की, सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेशासाठी रांग लागते. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसतंय. गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म नाही. याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेकडे येतायेत. भाजपानं आम्ही हिंदुत्व तोडलं असा आरोप केला. त्याला छेद देणारी आजची घटना आहे. बजरंग दल, विश्व हिंदु परिषदेप्रमाणेच बहुजन, वंचित, मुस्लीम बांधवही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातलं हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना