Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी (Maharashtra Karnataka Border Dispute) राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकावर टीका करताना दिसत आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.
सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोड यांच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमा प्रश्नावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. साधारणपणे प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे भवन असतात. मात्र, आपले आणि कर्नाटकचे नाते काय आहे, हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेले नाही. महाराष्ट्रात ते ‘कर्नाटक भवन’ बांधत आहेत. तसेच वृत्तपत्रात वाचले की, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे. परंतु, याबद्दल मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?
सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असतील तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी नवस का केला जात नाही? आता कर्नाटकने आपल्या तलावांमध्ये पाणी सोडले आहे आणि आपले सत्ताधारी सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खात आहेत. या नेभळटपणाविरुद्ध आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उदयनराजेचे धन्यवाद मानतो. गेल्यावेळी सांगितले होते की, भाजपमधील छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. त्याबाबत सुरुवात झाली आहे. तसेच, महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्यातील सुटकेशी केली जाते. अजूनही ते मंत्री राहत असतील तर महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"