'सरकार पडलेच पाहिजे, पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 08:59 PM2024-06-19T20:59:34+5:302024-06-19T21:00:17+5:30
पुन्हा BJP सोबत जायचं का? शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंचा थेट प्रश्न; शिवसैनिक म्हणाले...
Shiv Sena Uddhav Thackeray : आज शिवसेनेचा 58 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त मुंबईतील षण्मुखानंदमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. 'केंद्रातील हे सरकार पडले पाहिजे, पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजे. पडले, तर आम्ही इंडिया आघाडीसोबत सरकार स्थापन करू,' असा घणाघात यावेळी ठाकरेंनी केला.
मातेसमान शिवसेना फोडली...
उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, 'लोकसभेत शिवसेनेला मिळालेले यश फक्त माझ्यामुळे नाही. मी शून्य आहे, यशाचे खरे धनी तुम्ही आहात. आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदीमध्ये आहे आणि आत्मविश्वास आमच्यात आहे. निवडणुकीनंतर चर्चा सुरू केल्या की, उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार आहेत. ज्यांनी मातेसमान शिवसेनेला फोडलं, त्या नालायकांसोबत परत जायचं?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना केला. त्यावर सर्वांना नाही, असे उत्तर दिले.
हे सरकार चालेल वाटत नाही
उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, 'हे सरकार चालेल असे वाटत नाही, चालू नये असेच वाटते. सरकार पडलेच पाहिजे, पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे. पडले तर आम्ही इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करू. लोकशाही वाचवणे दहशतवाद असेल, तर मी दहशतवादी आहे,' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शिवाय, राज ठाकरेंना नाव न घेता टोलाही लगावला. 'मला विरोध करण्यासाठी काही उघड, म्हणजेच बिनशर्थ पाठिंबा दिला', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हल्ला केला.
षंड नसाल तर...
'तुम्ही प्रेमाने वागलात आम्ही प्रेमाने वागू, तुम्ही जर पाठीत वार कराल, तर आम्ही वाघ नख काढू. मिंध्ये आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल, तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता, धनुष्यबाण चिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा. माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंध्येच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभेसाठी मोदी तुम्ही सभा घ्या, या मिंध्येला बाजूला ठेवा, असे आव्हानदेथील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.
मविआला मतदान करणाऱ्यांना धन्यवाद
'काही क्षण असे येतात की, भावना व्यक्त करणे कठीण होते. लोकसभा निवडणुकीनंतर आपला शिवसेनेचा हा पहिला कार्यक्रम आहे. नुकतीच मविआची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मी सर्वांना धन्यवाद दिले. पण मी आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व देशभक्त ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, दलित या सर्वांना, मविआला मतदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतो. आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडल्याचा प्रचार ते डोमकावळे करत बसले आहेत. मी हिंदुत्व सोडलेलं नाही. देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला मतदान केले आहे,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.