मुंबई - मुख्यमंत्रीपद हवं आहे का हे विचारून एकनाथ शिंदेंचा अपमान करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवली या मंत्री दीपक केसरकरांच्या आरोपावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. मोदींची शिवसेना असलेल्यांनी बाळासाहेबांची शिवसेना असा उल्लेख करू नये असं त्यांनी म्हटलं.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, दीपक केसरकर हे मोदींच्या नावाला लागून अख्ख्या शिवसेनेच्या मूळावर उठले आहेत. शिंदे गटातील नेत्यांना ते लक्षात येत नाही. आम्ही मोदींची माणसं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावरून सांगतात. मग तुम्ही मोदींची शिवसेना म्हणा, बाळासाहेबांची शिवसेना कशाला सांगताय? मोदींच्या नावाची गरज शिंदेंना पडतेय. केसरकरांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सत्तेसाठी कोण मागे फिरले. सूरत, गुवाहाटीला कोण गेले. भारतभ्रमंती कुणी केली? ती सत्तेसाठीच होती ना. दावोसमध्ये ज्या कंपन्यांनी गुंतवणूक केली ती महाराष्ट्रात कशात केली. मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित करू नका. लोकांच्या जगण्यामरण्याशी संबंधित प्रश्नावर बोला. इतर मुद्द्यावर बोलण्यात अर्थ नाही असंही अंधारे यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदेंची अवस्था नारायण वाघांसारखी गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या सिनेमात ज्याप्रकारे नारायण वाघ सगळ्यांना बघून म्हणायचा साहेब तुमचा फोटो माझ्या खिशात असतो तशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था झालीय. मोदींसमोर असताना आम्ही मोदींची माणसं बोलतात, देवेंद्र फडणवीसांसमोर त्यांचे कौतुक करतात. शरद पवारांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे बोलले त्यावर पवारांनीही विश्वास ठेवला नसेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची वक्तव्य ही नारायण वाघांची वक्तव्य आहेत अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली.
राष्ट्रवादीच्या प्रबोधन यात्रेत सहभागी होणारराष्ट्रवादीकडून सन्मान महापुरुषांचा, आवाज महाराष्ट्राचा अशा परिषदा होणार असून यातील काही सभांना मी हजर राहणार आहे. महाविकास आघाडीचा घटक म्हणून आणि या महाराष्ट्रात ज्याप्रकारे महापुरुषांचा अवमान केला जातोय त्याचा निषेध करण्यासाठी मी उपस्थित असेन असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.