मुंबई - एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. आता हे बंड मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवारही मैदानात उतरले आहेत. दरम्यान, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सध्याच्या घटनाक्रमावर मोठं विधान केलं आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पार्टी. भाजपाचं आम्हाला समर्थन आहे, असं त्यांनी सांगितलंय. महाशक्तीसोबत जायचं असेल तर ते जाऊ शकतात. कुणी कुणाला अडवू शकत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांना जायचं आहे तर जाऊ शकतात, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावरून होऊ घातलेल्या न्यायालयीन लढाईबाबत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, न्यायालयीन बाजू कळत नसली तरी थोडीशी कळते त्यामुले जेव्हा जे होईल तेव्हा बघू. दरम्यान, आज संध्याकाळी विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली बैठक लावण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.