उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:59 AM2024-07-02T09:59:01+5:302024-07-02T10:00:56+5:30

मिलिंद नार्वेकर हे आज विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

shiv sena Uddhav Thackeray Milind Narvekar likely to contest Legislative Council election | उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?

उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?

Milind Narvekar ( Marathi News ) : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडीने आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले मिलिंद नार्वेकर हे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

संख्याबळानुसार भाजपला (एक मित्रपक्षासह) ५, अजित पवार गटाला २, शिंदे सेनेला २ आणि मविआला २ अशा जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पाच ते सहा अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. असं असताना मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यास ११ व्या जागेसाठी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले मिलिंद नार्वेकर हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र नार्वेकर यांनी ठाकरे यांचीच साथ देण्याची भूमिका घेतली.

विधानपरिषद निवडणुकीसाठी कसा आहे निवडणूक कार्यक्रम?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २ जुलै ही अखेरची तारीख असणार आहे.
 
अर्जाची छाननी : ३ जुलै २०२४
अर्ज मागे घेण्याची तारीख : ५ जुलै २०२४
मतदानाची तारीख : १२ जुलै २०२४ (सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी आणि निकाल : १२ जुलै २०२४ (सायंकाळी ५ वाजता)

Web Title: shiv sena Uddhav Thackeray Milind Narvekar likely to contest Legislative Council election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.