फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:38 IST2024-12-05T11:34:32+5:302024-12-05T11:38:12+5:30
पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते.

फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय
Devendra Fadnavis Oath Ceremony ( Marathi News ) : भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्याचं भव्य-दिव्य आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नसल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आणि भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल १३ दिवस चालेल्या खलबतांनंतर आज नव्या सरकारचा शपथविधी होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फोन करून निमंत्रित केलं होतं. परंतु या नेत्यांना अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
अनुपस्थितीचं कारण काय?
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यसभेचे सदस्य असणारे शरद पवार हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला येऊ शकणार नसल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे यांना वैयक्तिक करणास्तव या सोहळ्याला जाणं शक्य नसल्याची माहिती आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
किती जण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शपथविधी समारंभाला २० मिनिटेच उपस्थित राहणार होते पण आता त्यांनी एक तास या समारंभाला उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांच्या कार्यालयाकडे करण्यात आली आहे. तसे झाले तर केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीच नाही तर तिन्ही पक्षांचे काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह शिंदेंनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे अशी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांची इच्छा आहे, तशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, असे शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी सांगितले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील निर्णय झाला नव्हता.