किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर जहरी टीका; बाळासाहेब म्हणाले होते, त्याचे...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 01:32 PM2022-10-27T13:32:45+5:302022-10-27T13:34:01+5:30
तुम्ही लोकांना इतके गृहित धरायला लागला पण लोकांनी मनसेला गृहित धरलं आहे असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला.
मुंबई - कुणाचं अस्तित्व कुणामुळे धोक्यात येत नसतं. तुमचं अस्तित्व धोक्यात होतं असं वाटल्याने तुमच्या पक्षप्रमुखाला वेगळा पक्ष काढावा लागला. एकाबाजूला बाळासाहेब सांगतात, मी त्याचे षडयंत्र ओळखले. षडयंत्र हा शब्द बाळासाहेबांचा आहे. त्याला साथ देणारे तसेच असतात त्यामुळे त्यांना उत्तर देणे मी उचित मानत नाही. सरडा लाजेल एवढी भूमिका बदलतात अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंच्यामनसेवर निशाणा साधला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, भोंगे वाजवले, उद्दिष्ट साध्य केले. मग भोंगे बंद केले. आता पुन्हा भोंगे सुरू केले. तुम्ही लोकांना इतके गृहित धरायला लागला पण लोकांनी मनसेला गृहित धरलं आहे. तुम्ही त्यातून बाहेर येऊ शकत नाही. खोटं बोलणं हे मनसेचे काम आहे. त्या पक्षाचं नाव वेगळे आहे परंतु लोकांमध्ये प्रतिमा काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे असा घणाघात त्यांनी केला.
राणा दाम्पत्य नौटंकी, मुख्यमंत्री शिंदे खोटे
रवी रावा, नवनीत राणा यांची नौटंकी महाराष्ट्रात सुरू आहे. सीग्रेडपासून ए ग्रेडपर्यंत येण्यासाठी हा प्रयत्न आहे. बच्चू कडू यांनी स्वत:च्या हिंमतीवर पक्ष उभा केला. त्यांच्याबाबत नौटंकी आमदार-खासदार बोलत असेल तर बच्चू कडूंना त्रास होणं सत्यच आहे. बच्चू कडू आणि नौटंकी दाम्पत्यांत काही वाद नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. रेटून खोटे मुख्यमंत्री शिंदे सांगतात असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
घराला आग लावणाऱ्यांबद्दल काय बोलणार?
शिंदे गटाच्या आमदारांवर बोलणार नाही. सगळं आलबेल असताना घराला आग लावून जाणाऱ्यांना काय बोलणार? त्यांचे त्यांनी निस्तरावं. कोण गेले त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा कठीण प्रसंगात कोण आले, त्यांनी साथ आणि साद दिली ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. वाचाळवीरांना कुणी प्रश्न विचारत नाही. आम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. उद्धव ठाकरेंचा हात होता म्हणून मिंदे गट तुम्ही नावारुपाला आलात. दीपक केसरकारांच्या नावाने सावंतवाडीत जावं, तिथे लोकं रडतायेत. बेईमानी तुम्ही केली. प्रत्येक ठिकाणी चोच मारण्याची गरज नाही असा इशारा पेडणेकरांनी दिला आहे.
भाजपाकडं बक्कळ पैसा
जिथे भाजपाचं सरकार नाही तिथे माणसं फोडण्याचे भाजपाचे धंदे आहेत. रुपया घसरतोय माहिती नाही. दुष्काळ आलाय माहिती नाही. बक्कळ पैसा झालाय त्यामुळे घोडे, बैल खरेदी करतात तशी माणसं खरेदी करतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठेही हात घालू शकतात. आमची भीती वाटते. जिथे जिथे भीती वाटते तिथे तिथे उद्धव ठाकरे दिसतात. संताजी-धनाजी यांचे घोडे मुघलांना दिसत होते. तसे उद्धव ठाकरे विरोधकांना दिसतात. उद्धव ठाकरे योग्य मार्गावर आहेत हे सिद्ध झाले. ज्या शाखेत उद्धव ठाकरेंनी उद्धाटन केले आहे. दुसऱ्याचा बाप माझा म्हणून त्याच्या घरात कुरघोडी करणे, कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असतील सरकार म्हणून त्यांना पाठिशी घालत असाल तर त्याचा निषेध आहे असं किशोरीताईंनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"