Andheri Bypoll 2022: आगामी महापालिका निवडणुका आणि आताची अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून भाजपने पोटनिवडणूक लढवू नये, असे आवाहन केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे म्हटले. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यात उडी घेतली असून, या घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट आल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. शरद पवारांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपला आहे, त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
...म्हणून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला
राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्व. रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणुक लागली आणि शिवसेनेने ऋतुजाताईंना उमेदवारी देण्याचा निश्चय केला, असेही उद्धव ठाकरे यांनी यापुढे म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला
ऋतुजा लटके यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला. मात्र, न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचे राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेले आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, आर. आर पाटील, भाजपच्या शैलजा गिरकर यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरुन संबंधित पोटनिवडणुकीत शिवसेनेचा अधिकृत उमेदवार दिला नाही.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यातून शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाज आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल, अशी मला खात्री आहे, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"