सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करता, खरे नक्षलवादी तुम्हीच आहात; उद्धव ठाकरे कडाडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:20 PM2024-06-19T21:20:00+5:302024-06-19T21:20:44+5:30
'आम्ही हिंदुत्व सोडल्याचा प्रचार करता. चंद्राबाबू आणि नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का?'
Shiv Sena Uddhav Thackeray : आज शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळापा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरेंनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला. तसेच, भाजप नक्षलवादी असल्याची टीकाही केली.
तुम्हीच खरे नक्षलवादी आहात...
उद्धव ठाकरे म्हणतात, 'काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला, काही युट्युबरनेही प्रचार केला. तर मिंध्ये बोलले, हा शहरी नक्षलवाद आहे. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार नक्षलवाद वाटतो. लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल, तर मी आतंकवादी आहे. तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी-शाह सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतात. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता, नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता, दहशत निर्माण करता, हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का? सत्तेचा दुरुपयोग करणे, हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
'सरकार पडलेच पाहिजे, पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
चंद्राबाबू आणि नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का?
'आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडल्याचा प्रचार ते डोमकावळे करत बसले आहेत. मी हिंदुत्व सोडलेलं नाही. देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला मतदान केले आहे,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदींनीच सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे. आज भाजपाबरोबर कोण बसले आहेत? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? आंध्रात चंद्राबाबूंनी मुस्लीम समाजाला आश्वासने दिलेली नाहीत का? नितीश कुमारांनी मुस्लीम समाजाला आश्वासने दिलेली नाहीत का? मुस्लीम समाज आमच्याबरोबर आहे, कारण आम्ही तुमच्यासारखे पाठीत वार करत नाही,' अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.
मोदींनी विधानसभेचा प्रचार सुरू करावा
'मी नरेंद्र मोदींना आमंत्रण देतो की, त्यांनी विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरू करावा. मी आहे आणि तुम्ही आहात. नाव चोरायचे नाही, वडील चोरायचे नाहीत, पक्ष चोरायचा नाही, धनुष्यबाण बाजूला ठेवा आणि नवी निशाणी घ्या. मिंध्यांच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर. माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता. विधानसभेसाठी मोदी तुम्ही सभा घ्या, या मिंध्येला बाजूला ठेवा, असे आव्हानदेथील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.