मुंबई - एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार हे कोसळण्याच्या मार्गावर आहे. एकनाथ शिंदेंकडे वेगळा गट करण्यासाठी आवश्यक अशा ३७ हून अधिक आमदारांची जुळवाजुळव झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन अधिकच वाढलं आहे. सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबतं सुरू आहेत. अशा परिस्थितीत सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर दोन पर्याय आहेत.
एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे आमदार ज्या प्रकारे उभे आहेत, ते पाहता उद्धव ठाकरेंसमोर स्वत:ची खुर्ची वाचवण्यापेक्षा पक्ष आणि सत्ता वाचवण्याचं आव्हान उभं राहिलेलं आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी एक भावूक संदेश दिला. मात्र बंडखोर आमदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. या भाषणात त्यांनी कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री बनावं, असं मला वाटतं असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे हे कुठल्याही शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवू शकतात, हा उद्धव ठाकरेंसमोरील पहिला पर्याय आहे.
शिवसेनेतून बंडखोर झालेल्या एकनाथ शिंदे ज्याप्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेली महाविकास आघाडी तोडण्यासाठी पक्षप्रमुखांवर दबाव वाढवत आहेत ते पाहता उद्धव ठाकरेंसमोरील पर्यात मर्यादित झाले आहेत. त्यातच शिंदेंसोबत असलेल्या सर्व आमदारांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन करणे हा एकनाथ शिंदेंसमोर एक पर्याय आहे. बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे सातत्याने तीच मागणी करत आहेत.