मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील विविध ठिकाणच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत ३१ ऑगस्टला भेट घेणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. म्हाडाच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ही त्यांनी ही माहिती दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येत्या २६ तारखेला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे इतर आमदारही उपस्थित होते.
गृहनिर्माण धोरण, बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास, म्हाडाच्या ५६ वसाहतींचा पुनर्विकास, कॉर्पोस फंड, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, सेवाशुल्क, संक्रमण शिबिरे या प्रलंबित प्रश्नांबाबत आदित्य यांनी शिवसेनेचे आमदार यांच्यासोबत बुधवारी चर्चा केली होती. गिरणी कामगारांना सोडतीमध्ये मिळालेली घरे १० विकता येत नव्हती, मात्र आता ही अट शिथिल करून पाच वर्षांपर्यंत करण्यात येणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.
तसेच बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाने सुरू केला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून हा पुनर्विकास पुढे सरकू शकलेला नाही. हा पुनर्विकास जलद गतीने व्हावा यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच यामध्ये शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकासाची मार्गी लावणार आहे. येथील बीडीडी चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने त्यांच्यासोबत पाठपुरावा करून लवकरात लवकर पुनर्विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. तसेच गृहनिर्माण धोरणाची अंमलबजावणी करावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. यासह गिरण्यांच्या जागेवर १ हजार ८०० संक्रमण शिबिरांमधील गाळे उपलब्ध होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास लवकर मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाने नुकतीच एक उच्चस्तरीय समिती बनवली आहे. या समितीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना डावलण्यात आल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी पसरली आहे, याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता लोकांना मदत करायची आहे, बीडीडीतील रहिवासी चार वर्षे लोटल्यानंतरही संक्रमण शिबिरामध्ये का गेलेले नाही, यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे ते यावेळी म्हणाले.
आरे कॉलनीतील कारशेडला विरोध कायम कुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्यात येत आहे. या कारशेडला विरोध कायम असून यापूर्वीही आम्ही कांजूर येथील जागेचा पर्याय एमएमआरसीला सुचवला होता, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मांडली.