संघटनात्मक बांधणीखेरीज मनसेची उभारी अशक्य, हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ
By संदीप प्रधान | Published: January 24, 2020 05:15 AM2020-01-24T05:15:16+5:302020-01-24T05:16:33+5:30
शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत सामील झाल्याने जहाल हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास त्या पक्षावर मर्यादा आलेल्या आहेत. हे हेरुन राज यांनी आपल्या भात्यातून हिंदुत्ववादाचे अस्त्र बाहेर काढले आहे.
- संदीप प्रधान
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या आपल्या मूळ भूमिकेचाच पुनरुच्चार केला असला व बांगलादेशी व पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध एल्गार पुकारण्याचा निर्धार केला असला तरी त्याकरिता लागणारी संघटनात्मक बांधणी मनसेनी केलेली नसल्याने मनसेला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठी झेप घेण्यास मर्यादा येतील, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत सामील झाल्याने जहाल हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास त्या पक्षावर मर्यादा आलेल्या आहेत. हे हेरुन राज यांनी आपल्या भात्यातून हिंदुत्ववादाचे अस्त्र बाहेर काढले आहे. देशात सध्या सीएए व नागरिकत्व सर्वेक्षणावरुन वाद सुरू असताना राज यांनी बांगलादेशी व पाकिस्तानी नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची भूमिका घेतली. सध्या सीएए विरोधात मुस्लीमांचे मोर्चे निघत असून त्याला शक्तीप्रदर्शनातून शह देण्याकरिता हा मोर्चा असेल, असे ते म्हणाले. साहजिकच राज यांच्या या मोर्चाला भाजपकडून छुपे समर्थन लाभेल व रसद पुरवली जाणार हे उघड आहे. मात्र राज यांना खरोखरच जर आपली घोषणा प्रत्यक्षात उतरवायची असेल तर संघटनात्मक बांधणी करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी राज यांनी संघटनात्मक बांधणी केलेली नसल्याने पक्ष कमकुवत आहे.
राज हे एक कार्यक्रम गाजावाजा करुन पार पाडल्यावर दुसरा कार्यक्रम करेपर्यंत मधल्या काळात कार्यकर्त्यांना कुठलाही कार्यक्रम देत नाहीत. वेळोवेळी व्यक्त होत नाहीत व महाराष्ट्रात संचार करीत नाहीत. त्यामुळे दिशाहीन झालेला हा कार्यकर्ता अन्य पक्षांकडे वळला आहे. त्यातच राज्यात सेनेची सत्ता आल्याने सत्तेची ऊब मिळण्याच्या आमिषाने सेनेकडे वळला आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी पक्षाचा नवा ध्वज व नवा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज यांच्या या भूमिकेचा भाजपला लाभ होणार असल्याने भाजपचे नेते सुखावणे स्वाभाविक आहे. परंतु येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे संख्याबळाच्या निकषावर भाजपची मित्रपक्ष म्हणून गरज पूर्ण करण्यात कितपत यशस्वी होतो, यावर बरेच काही अवलंबून असेल. याची पहिली लिटमस टेस्ट कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत वर्षअखेरीस होईल. तेथे मनसेला नव्या भूमिकेमुळे चांगले यश लाभले तर भाजप-मनसे दोस्ताना ठाणे, मुंबई, नाशिक वगैरे महापालिका निवडणुकीत टप्प्याटप्प्याने पाहायला मिळेल. मात्र संख्याबळात मनसे कमी पडली तर भाजप मनसेच्या शिडात हवा भरेल, परंतु त्यांना पोटाशी घेणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
सत्तेची सूत्रे शिवसेनेकडे
राज्यातील सत्तेची सूत्रे शिवसेनेकडे असून शिवसेनेनी अद्याप हिंदुत्वाचा अधिकृतपणे त्याग केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार ही हवा शिवसेनेनी मनसेच्या संभाव्य हिंदुत्ववादी भूमिकेच्या अपेक्षेने केली असावी. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना कदाचित अधिक आक्रमक होईल. अशावेळी मनसेच्या लढवय्या मनसैनिकांची खरी कसोटी असेल, असे बोलले जाते.