राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ; भाजपा नेते प्रविण दरेकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 12:35 PM2020-02-09T12:35:29+5:302020-02-09T12:36:09+5:30
गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील.
मुंबई - पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलण्याची मागणी करत मनसेने गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान महामोर्चाचं आयोजन केलं आहे. मात्र हा मोर्चा भाजपा पुरस्कृत आहे अशी टीका शिवसेनेने केली होती. त्यावर भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी भाष्य करत राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ झाल्याचा टोला लगावला आहे.
याबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, देशाच्या व्यवस्थेवर घुसखोरांचा ताण असल्याने जो कोणी देशभक्त आहे ते मनसेच्या मोर्चाला सहभागी होऊ शकतात. बाळासाहेब ठाकरेंनी जी आक्रमक भूमिका पाकिस्तानी, बांग्लादेशीविरोधात घेतली होती. मात्र सत्तेच्या हवास्यापोटी शिवसेनेने सोयीस्कररित्या ही भूमिका बाजूला सारली आहे. शिवसैनिकांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मनसेच्या मोर्चाला मिळताना दिसत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेची स्पेस मनसे भरुन काढतंय, त्यामुळेच शिवसेनेकडून अशाप्रकारे टीका होत आहे. मनसेने मोर्चाचं नेतृत्व केलं असलं तरी अनेक देशभक्त या मोर्चात सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन मोर्चात लोकांनी सहभाग घेत असतील असं भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.
तर सीएए कायद्याचं समर्थन सर्वांनीच करायला हवं, मनसेचा मोर्चा पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात आहे त्यामुळेच त्याचं स्वागत केलं पाहिजे, शिवसेनेनेही सीएए कायद्याचं समर्थन करावं अस मत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.
मनसेच्या मोर्चाचा मार्ग?
गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन करुन मनसे कार्यकर्ते मोर्चाला रवाना
मनसेच्या मोर्चाला जाण्यापूर्वी दादर येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीला वंदन केलं. या दोन्ही महानेत्यांनी जे विचार आणले आहेत. ते विचार पुढे नेऊन जाणार आहोत असं मत मनसेचे विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये; मनसेचं शिवसेनेवर टीकास्त्र
मनसे मोर्चावेळी 'हे' मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रात चालू देणार नाही : विनायक मेटे
शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची 'बी टीम' झालीय; शिवसेनेच्या टीकेवर मनसेचा टोला
'आज मनसेचा बुलंद आवाज मुंबईत घुमणार, या आणि सामील व्हा'