मुंबई: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीवर (Motoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला. रवी राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. नवनीत राणा आणि रवी राणा घराबाहेर पडणार असल्याचे समजताच शिवसैनिक आक्रमक झाले. राणा यांच्या इमारतीसमोरील बॅरिकेटिंग तोडून आत जाण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. या एकूण परिस्थितीमुळे खार आणि कलानगर, वांद्रे भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यातच शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला असून, राणा दाम्पत्य म्हणजे शिवसेनेसमोर काहीच नाहीत. बाळासाहेब ठाकरे असते, तर चांगलेच हाणले असते, अशी घणाघाती टीका केली आहे.
राणा दाम्पत्याला आम्ही काडीची किंमत देत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या शिवसेना आणि शिवसैनिकांसमोर राणा दाम्पत्य म्हणजे किस झाड़ की पत्ती आहेत. राणा दाम्पत्यांना पुढे करून भारतीय जनता पक्षाचे लोकं हे जे माकडचाळे करत आहेत, त्यांना शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी सगळे शिवसैनिक रस्त्यावर आले आहेत, या शब्दांत विनायक राऊतांनी हल्लाबोल केला.
बाळासाहेब ठाकरे असते तर चांगलेच हाणले असते
राणा दाम्पत्यांनी कितीही वेळा दिल्या असल्या, तरी ते मातोश्रीवर येऊ शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे असते तर चांगलेच हाणले असते. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व शिकवण्याची यांची लायकी आहे का, असा रोखठोक सवाल राऊतांनी यावेळी केला. भाजपची तळी उचलण्यात राणा दाम्पत्याचे आयुष्य गेले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पैशांवर निवडणुका लढवायच्या, जिंकून यायचे आणि नंतर त्यांच्याच तोंडाला पाने पुसायचे काम राणा दाम्पत्याने केले आहे, अशी टीका राऊतांनी केली. राणा दाम्पत्याचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत. आम्ही रामभक्त आहोत, हनुमान भक्त आहोत, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपापल्या घरात वाचावी. दुसऱ्याच्या घरात जाऊन विनाकारण ड्रामा करायची गरज नाही. मातोश्रीवर जाऊन शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नये. धर्माचा आदर असणारे, प्रेम करणारे कमी आहेत का, या दोघांनीच धर्म सांभाळण्याचा मक्ता घेतला आहे का? राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राणा दाम्पत्य जबाबदार असेल. पाठीमागे कुणीतरी असणार, कुणाची तरी सुपारी घेतली असणार, कोण मागे आहे याचा शोध घ्यावा लागेल. स्वतःहून ते इतके धाडस करू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.