Shiv Sena Vs MNS: शिवसेनेच्या बॅनरबाजीला मनसेकडून बॅनरनेच उत्तर, उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 09:45 AM2022-04-15T09:45:03+5:302022-04-15T09:54:04+5:30
Shiv Sena Vs MNS: राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेत शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरू केल्यापासून शिवसेना आणि मनसेमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे.
- अल्पेश करकरे
मुंबई - राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेत शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरू केल्यापासून शिवसेना आणि मनसेमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे. एकीकडे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टोलेबाजी करत असतानाचा मुंबईत दोन्ही पक्षांमध्ये बॅनर वॉर रंगले आहे. या बॅनरमधून दोन्ही पक्ष एकमेकांवर शाब्दिक वार करत आहेत. दरम्यान, काल शिवसेना भवनाच्या परिसरात राज ठाकरेंवर टीका करणारा बॅनर झळकल्यानंतर आता मनसेनेही शिवसेनेला बॅनरच्या माध्यमातूनच उत्तर दिले आहे.
यातच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना भवन परिसरात बदलत्या भूमिकेवरून बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर शिवसेनेच्याच कोणीतरी लावले असावेत असा आरोप मनसेचा होता. त्यात आज मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची बदलती भूमिका यांच्याविरोधात शिवसेना भवन समोर हे बॅनर लावले जात होते.मात्र बॅनर लावत असताना पोलिसांनी मनसे पदाधिकार्यांच्या हातातून बॅनर काढत बॅनर लावू दिले नाहीत . काल लावण्यात आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील बॅनर विरोधातील मनसेचे हे शिवसेला प्रतिउत्तर होते असे मनसे पदाधिकारी संतोष माळी यांनी सांगितले.
मनसेच्या बॅनरमध्ये काय होतं ?
शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी भूमिकेतील आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेची भूमिका बदलत गेली आणि त्यांनी सत्तेसाठी आपले विचार सोडले असल्याचा आरोप मनसेने केला पूर्वी शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विचारावर आधारलेली शिवसेना होती मात्र पुढे भूमिका बदलली काँग्रेसला बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला त्यांच्यासोबत शिवसेनेने हातमिळवणी केली तसेच राष्ट्रवादी या पक्षाबरोबर देखील हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली दोन वेगवेगळ्या विचाराचे असलेल्या पक्षाबरोबर सत्ता स्थापन करून आपले विचार शिवसेना विसरली असल्याचा आरोप मनसेने काल आज आणि उद्या असे बॅनर लावत त्यावर सोनिया गांधी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दाखवत कशाप्रकारे शिवसेनेची भूमिका बदलली हे मनसेने बॅनरवर दाखवले आहे.
राज ठाकरेंच्या विरोधात दादरमध्ये बॅनरबाजी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा व उत्तर सभेत घेतलेल्या भूमिकेवरून राज्याचे राजकारण तापले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी सह शिवसेनेवर आपल्या भाषणात टीका केली. त्यामुळे शिवसेना विरुध्द मनसे असा वादंग देखील रंगला आहे. मनसेने शिवसेना भवनाबाहेर हनुमान चालीसा लावत शिवसेनेला दिवस झाले होते त्यात काल मध्यरात्री राज ठाकरे यांच्याविरोधात दादर शिवाजी पार्क परिसरात बॅनर लावण्यात आले.त्यातून राज ठाकरे यांच्या बदलणाऱ्या भूमिकेवर टीका करण्यात आलीय. हे बॅनर कोणी लावले हे अद्याप स्पष्ट नाही मात्र बॅनर आता काढण्यात आले आहेत पोलीस बॅनर कोणी लावले याचा तपास करत आहेत