मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० च्या आसपास आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा प्रतिस्पर्धी असलेल्या मनसेकडून सध्याच्या स्थितीवरून शिवसेनेला टोले लगावले जात आहेत. आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचले आहे.
उद्धव ठाकरेंचं सरकार टिकावं म्हणून शिवसेनेच्या शाखेत नमाज पठण झाल्याच्या व्हिडीओ ट्विट करत गजानन काळे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. त्या ट्विटमध्ये गजानन काळे म्हणाले की, मविआ सरकार टिकावं आणि शिवसेनेवरचं हे संकट दूर व्हावं म्हणून शिवसेनेच्या शाखेत नमाज पठण झालं. उगाच 'छोटे नवाबांच्या' सेनेला लोक 'जनाबसेना' म्हणत नाहीत. तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही. असे तुम्ही म्हणत असालही पण खरे हिंदुत्ववादी याच कारणांमुळेच तुम्हांला सोडून जात आहेत, असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे.
दरम्यान, शिवसेनेतील फुटीर गटातील १६ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या अपात्रता नोटिशीला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. या नोटीसविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे ढग इतक्यात विरणार नसल्याचे हे सोमवारी स्पष्ट झाले.
झिरवाळ यांनी बजावलेल्या अपात्रता नोटीसविरोधात शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शिंदे गटाकडून प्रसिद्ध वकील नीरज किशन कौल यांनी बाजू मांडली, तर उपाध्यक्षांची बाजू ॲड. राजीव धवन यांनी मांडली. विधानसभेतील शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी व मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यावतीने अभिषेक मनु सिंघवी व महाराष्ट्र सरकारकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.