Join us

Shiv Sena vs Navneet Rana at Matoshree: खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस; शिवसेनेच्या ९२ वर्षांच्या 'फायर आजी' आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 4:44 PM

Shiv Sena vs Navneet Rana at Matoshree: युवा सैनिकांकडून 'आजी फायर है'च्या घोषणा; खुद्द मुख्यमंत्री ठाकरेंनी केली आजींची विचारपूस

मुंबई: हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी. अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसेचं पठण करू, अशी भूमिका खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणांनी घेतली. यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं मातोश्रीबाहेर जमले. राणा दाम्पत्याच्या मुंबईतल्या घराबाहेरदेखील शिवसैनिक जमा झाले. 

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राणा दाम्पत्यानं केली. मात्र शिवसैनिक आक्रमक आहेत. मातोश्रीची माफी मागा, अन्यथा घराबाहेर पडू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. राणा दाम्पत्यानं थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिल्यानं शिवसेनेला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली. 

मातोश्रीबाहेर शिवसैनिक दोन दिवसांपासून ठिय्या देऊन आहेत. राणा दाम्पत्यानं आत जाऊन दाखवावं असं आव्हान या शिवसैनिकांनी दिलं. या शिवसैनिकांमध्ये एक ९२ वर्षांच्या आजीदेखील उपस्थित आहेत. शाखा क्रमांक २०२ च्या शिवसैनिक असलेल्या चंद्रभागा आजी दोन दिवसांपासून मातोश्राबाहेर आहेत. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येऊनच दाखवावं. आम्ही गुपचूप येऊ आणि हनुमान चालिसा म्हणून जाऊ, असं राणा दाम्पत्याला वाटलं असेल. पण तसं काही आम्ही होऊ देणार नाही, असं चंद्रभागा आजी म्हणाल्या. आजींचा उत्साह पाहून त्यांच्यासोबत युवासैनिकांनी 'आजी फायर है' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

रणरणत्या उन्हात ठिय्या देऊन बसलेल्या चंद्रभागा आजींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचारपूस केली. त्यांना काळजी घेण्यास सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंपासून मी शिवसेनेत आहे. पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. मातोश्रीला कोणी आव्हान देत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येण्याची हिंमत करूनच दाखवावी, असं आव्हानच त्यांनी दिलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेरवी राणाशिवसेनानवनीत कौर राणा