मुंबई: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले. त्यावरून शिवसैनिक संतप्त झाले आहेत. यानंतर लगेचच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर जमण्यास सुरुवात केली. यातच तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी मध्यरात्री शिवसैनिकांशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे.
राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांची भेट घेतली. यानंतर रात्रभर शिवसैनिकांचा मातोश्रीवरील ओघ सुरूच होता. मध्यरात्रीपासूनच शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर गर्दी जमा झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी मध्यरात्री मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. यावेळी जेवणाची आणि पाण्याची तेजस ठाकरे यांनी विचारपूस केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
रवी राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा
दरम्यान, शनिवार सकाळपासूनच रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी शिवसैनिक जमा झाले असून, ती गर्दी वाढत चालल्याचे दिसत आहे. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे, राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे. तरी राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
दरम्यान, मातोश्रीवर हनुमान चालीसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालीसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचे स्वागत केले असते, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले होते.