राणा दाम्पत्य मुंबई सोडण्याच्या तयारीत; पण शिवसैनिकांची एकच अट, परिस्थिती चिघळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 04:15 PM2022-04-23T16:15:11+5:302022-04-23T16:17:15+5:30
राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घराबाहेर शिवसैनिकांची मोठी उपस्थिती; पोलीस बंदोबस्त तैनात
मुंबई: हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबई दौरा आहे. त्यांच्या दौऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणांनी केली. मात्र यानंतरही शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
आंदोलन मागे घेणारं राणा दाम्पत्य दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याचं अमरावतीमध्ये निवासस्थान आहे. मात्र तिथेही शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. त्यामुळे अमरावतीला जाऊ नका, अशी विनंती पोलिसांकडून राणा दाम्पत्याला करण्यात आल्याचं समजतं. त्यामुळे राणा पती पत्नी दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. नवनीत राणा लोकसभेच्या खासदार आहेत. दिल्लीत त्यांचं निवासस्थान आहे.
''तोपर्यंत एकही शिवसैनिक जागचा हलणार नाही''
राणा दाम्पत्यानं आंदोलन मागे घेतलं असलं तरीही शिवसैनिक आंदोलनावर ठाम आहेत. राणा दाम्पत्यानं माफी मागावी. ते माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना इथून जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांनी राणांच्या मुंबईतील घराबाहेर बंदोबस्त वाढला आहे.
राणा यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी जल्लोष केला. फटाके फोडले. राणा दाम्पत्यानं मातोश्रीची माफी मागावी. अन्यथा त्यांना इथून जाऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. शिवसैनिकांना डिवचायचा, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. बराच काळ सहन केलं. पण आता शिवसैनिकांचा संयम संपला, असं परब म्हणाले.
आंदोलन मागे घेत असतानाही राणांनी प्रक्षोभक शब्दांचा वापर केला. त्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवणार आहोत. पोलिसांनी योग्य कारवाई करावी. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण सांगून राणा दाम्पत्य पळ काढत आहे. मात्र त्यांच्यामुळे दोन दिवसांपासून मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मातोश्री आमचं दैवत आहे. त्याकडे वाकड्या नजरेनं पाहू नका. शिवसैनिक गदाधारी आहेत. त्यांच्या वाट्याला जाऊ नका. गेल्या दोन दिवसांत तुम्हाला घराबाहेर पाऊलही टाकता आलेलं नाही हे लक्षात ठेवा, असं परब यांनी म्हटलं.