युतीसाठी शिवसेना तयार, पण मागण्या पाहून भाजपा हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 01:04 AM2018-12-30T01:04:25+5:302018-12-30T12:16:41+5:30
लोकसभेबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेचीही निवडणूक घ्या आणि दोन्ही निवडणुकात युतीमध्ये आम्हाला ५० टक्के जागा लढायला द्या, असा प्रस्ताव शिवसेनेकडून दिला जाऊ शकतो.
मुंबई : लोकसभेबरोबरच महाराष्ट्रात विधानसभेचीही निवडणूक घ्या आणि दोन्ही निवडणुकात युतीमध्ये आम्हाला ५० टक्के जागा लढायला द्या, असा प्रस्ताव शिवसेनेकडून दिला जाऊ शकतो. भाजपाकडून चर्चेचा प्रस्ताव आल्यास ही भूमिका स्पष्टपणे मांडण्याचे शिवसेनेत ठरले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यात युतीमध्ये मोठा भाऊ कोण आहे हे मतदार निवडणुकीत ठरवतील पण युती करायची असेल तर फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्य$ुला मान्य करावा लागेल, असे शिवसेनेकडून भाजपाला सांगितले जाईल. या शिवाय, पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्या यावर शिवसेना अडून बसेल. लोकसभेच्या ४८ पैकी २४ तर विधानसभेच्या २८८ पैकी किमान १४४ जागांच्या खाली युतीमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारायची नाही, असा सूर शिवसेनेत असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा आपल्याबरोबर युती करेल आणि गेल्यावेळेप्रमाणे विधानसभेत स्वबळावर लढेल, अशी शंका शिवसेनेला वाटते. त्यामुळेच एकत्रित निवडणुकीचा आग्रह शिवसेनेकडून धरला जाईल, असे म्हटले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडे भाजपाचे आमदार आणि जिल्हाध्यक्षांची जी बैठक घेतली होती तीत, दोन्ही निवडणुका एकत्र लढविल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले होते.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचीदेखील हीच भूमिका असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एकत्र निवडणुकीची मागणी शिवसेनेकडून आल्यास ती भाजपा मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. भाजपाने शिवसेनेची मागणी फेटाळली तर मग दोन्ही निवडणुकांचे जागावाटप एकत्र निश्चित करा व त्याची घोषणादेखील एकाचवेळी करा, असा आग्रह शिवसेनेकडून धरला जाऊ शकतो. युतीसाठी भाजपाकडून अद्याप कोणताही प्रस्ताव मातोश्रीला देण्यात आलेला नाही.
भाजपाला एकत्रित निवडणूक नको
भाजपाला दोन्ही निवडणुका एकत्र लढवायच्या नाहीत. तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले होते.