विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चाच्या जोरदार तयारीला लागली शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 07:33 PM2019-07-15T19:33:57+5:302019-07-15T19:34:21+5:30
विमा कंपन्यांच्या विरोधात येत्या बुधवार दि. 17 रोजी शिवसेना मुंबईत बिकेसी येथील विमा कंपन्यांवर विशाल मोर्चा काढणार आहे.
मुंबई - विमा कंपन्यांच्या विरोधात येत्या बुधवार दि. 17 रोजी शिवसेना मुंबईत बिकेसी येथील विमा कंपन्यांवर विशाल मोर्चा काढणार आहे.त्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून या मोर्च्याच्या तयारीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून, यावेळी जोरदार शक्ति प्रदर्शन शिवसेना करणार आहे.
या मोर्च्याच्या पूर्व तयारीसाठी शिवसेनेचे प्रवक्ते,आमदार व विभागप्रमुख अँड.अनिल परब यांनी जास्तीस्त जास्त शिवसैनिक व महिला आघाडीने या मोर्चाला उपस्थित राहण्याचे फर्मान काढले आहे.आमदार परब यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पूर्व जे. बी.नगर येथील गोयंका हॉल येथे या मोर्चाच्या पूर्व तयारी साठी नुकतीच विभाग क्रमांक 4 व 5 आणि चांदीवली विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी सभा झाली.शिवसेनेच्या अश्याच सभा मुंबईतील शिवसेनेचे इतर सर्व विभागप्रमुख आपल्या भागात घेत असून या मोर्च्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जमाफी दिली; परंतु अनेक शेतकरी आजही त्यापासून वंचित आहेत. पीक विमा कंपन्यांनी अजूनही त्यांना पैसे दिलेले नाहीत. या कंपन्यांना शिवसेना आपल्या स्टाइलने या मोर्चाद्वारे जाब विचारणार आहे अशी माहिती आमदार अनिल परब यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉटजवळून बुधवार दि,17 रोजी सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा कंपनी या मार्गाने हा जिओ वर्ल्ड कंपनीच्या इमारतीला वळसा घेऊन ‘परिणी’ या इमारतीसमोर मोर्चा थांबेल. या इमारतीच्या 19व्या मजल्यावर ‘भारती ऍक्सा’ कंपनीचे कार्यालयात शिवसेनेचे शिष्टमंडळ जाऊन तेथील संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पीक विम्याच्या पैशांबाबत जाब विचारेल अशी माहिती त्यांनी दिली. या धडक मोर्चात शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह हजारो शिवसैनिक आणि नागरिक सहभागी होणार आहे.
मुंबईतील शिवसेनेचा हा विशाल मोर्चा हा प्रतीकात्मक मोर्चा असून त्याच दिवशी राज्यभरातील पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये शिवसेनेची शिष्टमंडळे जाणार आहेत, अशी माहिती आमदार अनिल परब यांनी शेवटी दिली.