Join us  

राहुल गांधींच्या 'मी हिंदू' भूमिकेचं शिवसेनेकडून स्वागत, सांगितलं शिवसेनेचं हिंदुत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 7:41 AM

कधी काळी देशात मुसलमान, दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे

ठळक मुद्देकाँग्रेसकृत हिंदूंचे राज्य या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला असून राहुल गांधींनी घासलेला हा दिवा पेटवता आला पाहिजे, असे शिवसेनेनं म्हटलं आहे.  

मुंबई - काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी राजस्थानच्या जयपूर येथून हिंदू आणि हिंदुत्त्ववादी फरक स्पष्ट करत भाजपला लक्ष्य केले. हिंदू म्हणजे सत्य आणि हिंदुत्ववादी म्हणजे सत्ता होय. हिंदू म्हणजे महात्मा गांधी आणि हिंदुत्ववादी म्हणजे गोडसे असे म्हणत राहुल यांनी भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या या भूमिकेचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून राहुल गांधींच्या जयपूरमधील भाषणाचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. काँग्रेसकृत हिंदूंचे राज्य या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला असून राहुल गांधींनी घासलेला हा दिवा पेटवता आला पाहिजे, असे शिवसेनेनं म्हटलं आहे.  

कधी काळी देशात मुसलमान, दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे. भाजप त्याचेच 'खात' आहे. अशा परिस्थितीत विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला आहे. गांधी हिंदू तर गोडसे हिंदुत्ववादी अशी फोड करून त्यांनी चर्चा सुरू केली. हिंदू म्हणजे सत्य व हिंदुत्व म्हणजे सत्ता असे ते म्हणाले; पण देश हिंदूंचा आहे हा विचार त्यांनी पुन्हा घासून पुसून वर आणला आहे. घासलेला हा दिवा त्यांना पेटविता आला तर स्वागतच, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. 

काँग्रेसला नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न

सन 2014 पासून देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, हिंदूंचे नाही. आणि आपल्याला हिंदुत्ववाद्यांना घालवायचे आहे आणि पुन्हा हिंदू राजवट आणायची आहे,'' असा महनीय विचार गांधी यांनी मांडला आहे. हिंदू आणि हिंदुत्व याबाबत त्यांनी शब्दच्छल केला आहे. तरीही देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाला साद घालण्याची भूमिका अनेक वर्षांनंतर काँग्रेसने घेतली. निधर्मीवाद म्हणजे फालतू सेक्युलरवादाच्या फंदात व छंदात अडकून पडलेल्या काँग्रेसला राहुल गांधींनी नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे शिवसेनेनं म्हटलं आहे.  

मुस्लीम व दलित काँग्रेसकडून दूर गेले

काँग्रेसची आजची अवस्था गावातल्या जमीनदारी गेलेल्या पडक्या भग्न वाडय़ासारखी झाली असल्याचे विश्लेषण शरद पवारांसारख्या नेत्यांनी केले, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. मुस्लिम व दलित मतांची घसघशीत रोकडा पेढी हेच त्या जमीनदारीचे फळ होते. याच मुसलमान-दलितांच्या 'रोकडा'मुळे काँग्रेसचा वाडा चिरेबंदी तसेच वैभवशाली वाटत होता. आज ही दोन्ही खणखणीत नाणी काँग्रेसच्या मुठीतून सुटली व उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, प. बंगालसारख्या मोठ्या राज्यांतून काँग्रेसची घसरण झाली. 

महाराष्ट्रातील मु्स्लीमांनी शिवसेनेला स्वीकारले

मुंबई-महाराष्ट्रातला मुसलमान बिनधास्तपणे शिवसेनेला मतदान करतो. मुस्लिमांचे मतांसाठी फालतू लांगूलचालन न करणाऱ्या शिवसेनेला मुस्लिम समाजाने आपले मानावे हा काँग्रेससारख्या 'सेक्युलर' पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे. सेक्युलरवाद म्हणजे हिंदूंना लाथा व मुसलमानांचे ऊठसूट लांगूलचालन ही भूमिका योग्य नसून हा देश सगळय़ांचा आहे. या देशाचा धर्म हिंदू आहे, पण येथे सर्व धर्म गुण्यागोविंदाने देशाचे नागरिक म्हणून राहू शकतात. मातृभूमीला वंदन करणारा, देशासाठी त्यागास तत्पर असलेला मुसलमान हा भारतमातेचाच पुत्र आहे हा विचार म्हणजेच राष्ट्रवाद आणि निधर्मीवाद. शिवसेनेने हिंदुत्व म्हणून याच विचारांची कास धरल्याचेही राऊत यांनी अग्रलेखातून सांगितले आहे. 

निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूंना सावत्रपणाचीच वागणूक

हिंदू संस्कृती ही सहिष्णू आहे, पण षंढ नाही, हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी रुजविला व लोळागोळा पडलेला हिंदू समाज जागृत झाला. 1947 साली धर्माच्या नावावर हिंदुस्थानची फाळणी झाली. मुसलमानांसाठी त्यांचे हक्काचे पाकिस्तान निर्माण झाले. तेव्हा राहिलेला देश हा हिंदूंचाच आणि हिंदूंसाठी, असे मानले तर काय चुकले? पण पहिल्यापासून निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूंना सावत्रपणाचीच वागणूक त्यांच्या देशात मिळाली. शंकराचार्यांपेक्षा जामा मशिदीच्या इमामांशी सलगी करण्यातच सेक्युलरवाद्यांना धन्य धन्य वाटू लागले. रामापेक्षा बाबरभक्तीत राज्यकर्ते लीन झाल्यावर लोकांच्या असंतोषाचा भडका उडाला व काँग्रेस त्यात होरपळून निघाली. हे सत्य नाकारता येत नाही, असेही शिवसेनेनं स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :काँग्रेसशिवसेनाराहुल गांधीहिंदू