मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन, तसेेच केंद्राकडून राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण आदी मुद्द्यांवर शिरोमणी अकाली दलाने घेतलेल्या भूमिकेशी शिवसेना सहमत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अकाली दलाचे नेते, खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या भारत बंदला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. चंदूमाजरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अकाली दलाचे नेते प्रथमच भेटले. चंदूमाजरा म्हणाले की, शेतकरी आणि सरकारमधील चर्चा यशस्वी व्हावी, अशीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांशी चर्चा न करताच हे कायदे बनविले आहेत. दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सर्व अधिकार स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहेत. शिरोमणी अकाली दल संघराज्य व्यवस्थेच्या बाजूने आहे. याबाबत आमच्या भूमिकेलाही ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.
एनडीए सोडणारी शिवसेना, अकालीही शेतकऱ्यांसोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 6:52 AM