शिवसेना जेवढ्या जागा देईल त्या मान्य - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 07:43 AM2023-01-04T07:43:39+5:302023-01-04T07:44:24+5:30
शिवसेना आणि वंचितमध्ये बोलणी झाली आहे. सध्या तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुका ठाकरे शिवसेना आणि वंचितने एकत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचितमधील बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिका निवडणुका तसेच पुढच्या निवडणुकांमध्येही शिवसेना आणि वंचितसोबतच जाणार आहोत. आधी ८३ जागांसाठीची आमची मागणी होती. पण आता शिवसेना जेवढ्या जागा मुंबई महापालिकेसाठी सोडेल त्या मान्य असतील, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
शिवसेना आणि वंचितमध्ये बोलणी झाली आहे. सध्या तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुका ठाकरे शिवसेना आणि वंचितने एकत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. यापुढच्या निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. शिवसेनेचा असा प्रयत्न आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घ्यावे. वंचितचाही त्याला विरोध नाही. मात्र, सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती कळली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला उघड विरोध आहे. तसेच काँग्रेसचाही आम्हाला छुपा विरोध असल्याचे आंबेडकर म्हणाले. याआधी मुंबई पालिकेसाठी ठाकरे शिवसेना आम्हाला जितक्या जागा सोडेल त्या आम्हाला मान्य असतील, असेही ते म्हणाले. शिवसेना आणि आमच्यात जागा वाटपाचे कोणतेही भांडण नाही. आमचा एकही नेता तपास यंत्रणांच्या रडारवर नाही. त्यामुळे वंचित आणि उद्धव ठाकरे शिवसेनेची युती मला स्थिर दिसत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या चाव्या फडणवीस दाबतील
महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाव्या दाबतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठीदेखील फडणवीस प्रयत्न करतील, असा दावाही आंबेडकर यांनी केला.