'देशात जिथं गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील'

By महेश गलांडे | Published: November 17, 2020 01:56 PM2020-11-17T13:56:11+5:302020-11-17T13:57:07+5:30

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन असून शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी संजय राऊत आले होते.

'Shiv Sena will be present in the country with the sword of Hindutva wherever it is needed', sanjay raut | 'देशात जिथं गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील'

'देशात जिथं गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील'

Next
ठळक मुद्देदिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन असून शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी संजय राऊत आले होते.

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात येत आहे. शिवसेना नेते, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांकडून स्मृती स्थळावर जाऊन बाळासाहेबांना वंदन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शिवर्तीर्थावर जाऊन दर्शन घेतले. तसेच, शिवाजी पार्क येथून खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना भाजपावर टीका केली. तसेच, हिंदुत्वासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज आम्हाला नसल्याचंही ते म्हणाले    

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन असून शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ''आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू असं म्हणत राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं. 

“गेल्या वर्षी याच काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती. लोकांच्या मनात शंका होत्या. पण आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळार शिवसेनेचा मुख्यमंत्री तेसुद्दा उद्धव ठाकरे यांच्या रुपाने मानवंदना देण्यासाठी आले आहेत. बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना कायम राहील. पण बाळासाहेब आमच्यासोबत आहेत आणि सतत राहतील, प्रेरणा देतील असा विश्वास आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. 

“आजच्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला पण त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरुपी आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात हा वारसा पुढे नेऊ, देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील”, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

मनसेची शिवसेनेवर टीका

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, स्मारक की मातोश्री ३ असं ट्विट केलं होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु मागील ३ वर्षात याठिकाणी कोणतीही हालचाल नाही, बंगला बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आला आहे. ही खासगी संपत्ती नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काय झालं? हे जनतेला सांगावे असं आवाहन त्यांनी शिवसेनेला केलं होतं.

शिवसेनेचं उत्तर 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावत त्यावर म्हटलं की, ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. तर भाजपावर टीका करता राऊत म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत, जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते, त्यामुळे फक्त द्वेष भावनेतून नाव बदलणं, राजकीय हेतूने प्रेरित असणं हे ठीक नाही असं त्यांनी सांगितले.
 

Web Title: 'Shiv Sena will be present in the country with the sword of Hindutva wherever it is needed', sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.