मनोहर कुंभेजकर
मुंबई : 1996 पासून मुंबई महानगर पालिका शिवसेनेच्या ताब्यात असून 2022 ची होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेचा सेनापती व शिवसेना सज्ज झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकीकडे राज्याची धुरा सांभाळतांना आणि कोविडशी यशस्वीपणे मुकाबला करतांना मुंबई महानगर पालिकेच्या निवणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.आगामी पालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेनेत लवकरच होणार फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन वर्षात हे बदल होतील असे समजते.
आकार्यक्षम व ज्यांच्या तक्रारी आहेत असे शिवसेनेचे पुरुष व महिला उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,गटप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार असून शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेत लवकरच फेरबदल होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी जोमाने काम सुरू केले आहे, तर काहींनी आपली खुर्ची टिकवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचे समजते.
आगामी पालिका निवडणुकीच्या प्राथमिक तयारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हाताळली जातात त्या "वर्षा" या मुख्यमंत्रांच्या निवासस्थानी खास मुंबईतील 36 विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. यामध्ये शिवसेनेच्या 12 विभागांमधील पुरुष व महिला विधानसभा संघटक,विधानसभा समन्वयक,शिवसेनेचे नगरसेवक,नगरसेविका,उपविभागप्रमुख व 227 शाखाप्रमुख यांचा समावेश होता.यावेळी शिवसेनेचे 12 पुरुष व महिला विभागप्रमुख,शिवसेनेचे आमदार देखिल उपस्थित होते.वर्षा बंगल्यावर गेल्या दि,21 ते दि,26 पर्यंत मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्राथमिक बैठका पार पडल्या.
वर्षा बंगला बघण्याची संधी फार थोड्यांना मिळते. मात्र चक्क वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण आले, विशेष म्हणजे खास आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी बोलावले यामुळे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा आनंद ओसांडून वाहत होता.वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर आठवण म्हणून पदाधिकाऱ्यांनी मोबाईल मधून फोटो काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले होते. गरम गरम चहा,चविष्ट उपमा व लाडू यांचा आस्वाद त्यांनी घेतला.
एक संध्याकाळ वर्षावर" कार्यक्रमात पक्षबांधणी आणि येत्या निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर झालेल्या विभागनिहाय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे 6 ते 7 मिनीटे संवाद साधला. मिशन 2022 लक्षात ठेवा आणि पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा,विरोधकांच्या आरोपकडे दुर्लक्ष करा. आपल्या प्रभागातील शिल्लक नागरी कामे ती विभागप्रमुख व आमदारांच्या मार्फत घेऊन या ती कामे पूर्ण केली जातील असा संवाद मुख्यमंत्र्यांनी यावेळी साधला. हा सुंदर अनुभव दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून मनःपूर्वक आभार देखिल मानले.