वह्या-पुस्तकासाठी रडणाऱ्या काव्यांजलीचं पडकं घर उभारणार, शिवसेना बांधून देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:52 PM2019-08-22T12:52:43+5:302019-08-22T13:19:24+5:30
कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर येथील काव्यांजली संजय कांबळे या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
मुंबई - कोल्हापूर अन् सागंलीतील महापूरात कित्येक संसार मोडून पडले. लाखो लोकांचे स्थलांतरही करण्यात आलं होतं. महापूराच्या प्रलयातून सावरल्यानंतर राज्यभरातून पूरग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्यात येत. अन्न-धान्याची मदत मोठ्या प्रमाणात येथील कुटुबीयांना महाराष्ट्राने पुरवली आहे. मात्र, येथील नागरिकांचे संसार उभारण्यासाठी खऱ्या मदतीची गरज आहे. कोल्हापूर-सांगलीत गेल्या 10 दिवसांपासून आरोग्य शिबीर भरविणाऱ्या शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वांनाच मदतीची विनंती केली होती. त्यानुसार शिवसेनेच्या नेत्यांनी पुढाकारही घेतला आहे.
कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर येथील काव्यांजली संजय कांबळे या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये, माझे सगळे वह्या आणि पुस्तकंही भिजलेत, असं म्हणताना काव्यांजली रडत होती. याच काव्यांजलीच्या सिद्धार्थ नगर येथील घराला शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि शिवसेना ग्रामीणचे नेते रमेश म्हात्रे यांनी भेट दिली. त्यावेळी, काव्यांजलीचे पडलेलं घरं आणि मोडलेला संसार पाहून तिचं संपूर्ण घर नव्याने बांधून देणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, याकामाची सुरुवात म्हणून रोख स्वरुपात 2 लाख रुपयांची मदतही म्हात्रे यांनी केली. तसेच, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ जे.बी. भोर यांनीही रोख 25 हजार रुपयांची मदत दिली.
काव्यांजली ही शालेय मुलांची, लहानग्यांची आयडॉल आहे. महाराष्ट्र शासनाची मदत येईलच. पण, सध्या हे कुटुंब बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहात राहत आहेत. त्यामुळे ते घरं उभारुन तिला निवारा देणं गरजचेचं असल्याचं म्हटलंय. काव्यांजलीसह अनेकांची घरं पडली आहेत. पण, काव्यांजली ही येथील चिमुकल्यांची प्रतिनधीत्व करते. त्यामुळेच तिंच संपूर्ण घर फर्निचर आणि भांडीकुंडीसह बांधून देणार असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. तसेच, हिच्या अभ्यासासाठी स्पेशल टेबल आणि लॅम्पही देऊ, असे म्हणताच काव्याजंलीच्या चेहऱ्यावर हसू उलटले.
दरम्यान, 15 ऑगस्ट इतरही दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांकडून काव्यांजली वह्या-पुस्तकं देण्यात आली आहेत. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार एखाद्याचं घरं उभारणं आम्ही आपलं कर्तव्य मानतो. त्यामुळेच, काव्यांजचं घर ही शिवसेनेची जबाबदारी असल्याच म्हात्रे यांनी म्हटलं आहे. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून गेल्या 10 दिवसांपासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य शिबीर सुरू आहे. या शिबीराच्या माध्यमातूनच मदत करतेवेळी वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी काव्यांजलीच्या घराचा शोध घेऊन काव्यांजलीला मदत करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार, काव्यांजलीच्या घराला भेट देऊन तिच्या मोडलेल्या संसारात पाठीवर हात ठेऊन लढण्याचं बळ दिलंय.