मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून १८ जागांवर दावा करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकमत झाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, जागावाटपाची चर्चा आणि अधिकार पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
२०१९ ला शिवसेनेने २२ जागा जिंकल्या होत्या आता १८ जागांवर उम्मेदवार तयारी सुरु करणार असून उरलेल्या ४ जागांचे भविष्य एकनाथ शिंदे ठरवतील, असे अधिकार संसदीय दलाने त्यांना दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षातील खासदार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार उपस्थित होते.
या बैठकीत इतरही अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विशेष समिती बनविण्याचा निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. निवडणूक काळात करण्यात येणाऱ्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली विकासाची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रमुख उद्दिष्टे असणार आहे. त्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय, इतर महामंडळांची केलेली घोषणा आणि शिवडी नाव्हाशेवा सारखी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची केलेली घोषणा हे यंदाच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय यंदाच्या प्रचारात पक्षाकडून पुन्हा एकदा हिंदुत्त्वावर भर देण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेच्या खासदारांकडून देण्यात आली आहे.
यावेळी सर्व उम्मेदवारांना मित्र पक्षाशी समन्वय बाळगण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच अबकी बार ४५ पार करण्याचे लक्ष्य सहकार्याने व समन्वयाने जिंकण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांना मध्ये समन्वय वाढवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मुख्य म्हणजे या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईकरिता विशेष समन्वय समिती जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रस्तावही मांडण्यात आला आहे. याशिवाय घटक पक्षांसोबत समन्वय साधण्यासाठीही समन्वय समिती असावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला असून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प पक्षातर्फे या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.