Aditya Thackeray Ayodhya Visit: मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचंच रामराज्य येणार, आदित्य ठाकरेंनी अयोध्येतून व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:21 PM2022-06-15T18:21:58+5:302022-06-15T18:22:52+5:30
Aditya Thackeray Ayodhya Visit: आदित्य ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीबाबत विचारले असता कुठल्याही निवडणुकीत आव्हान असतं. चांगलं काम करण्यासाठी रामलल्लांचे आशीर्वाद असतील तर बीएमसीमध्येही रामराज्य आणू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
अयोध्या/मुंबई - शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे हे आज श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या दौऱ्यामधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे आणि शिवसेनेने केला आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीबाबत विचारले असता कुठल्याही निवडणुकीत आव्हान असतं. चांगलं काम करण्यासाठी रामलल्लांचे आशीर्वाद असतील तर बीएमसीमध्येही रामराज्य आणू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेना पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अवतारात दिसतेय का, असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, मला वाटतं अवतार, राजकारण याबाबत इथे बोलणं योग्य ठरणार नाही. शिवसेनेचं राजकारण आणि हिंदुत्व सर्वांना माहीत आहे. मी नेहमी सांगतो की, आमचं राजकारण सरळ आहे आणि आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. रघुकुल रीत सदा चली आएं प्राण जाए पर वचन ना जाए हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही निवडणुकीत जी वचनं देतो ती पूर्ण करतो. मग निवडणूक असो वा नसो, जिंकलो, हरलो तरी आम्ही दिलेले वचन पूर्ण करतो.
आम्ही येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही आस्थेने दर्शनासाठी आलो आहोत. गेल्यावर्षीही आलो होते. कोरोनाकाळात आम्ही येऊ शकलो नव्हतो. मात्र तत्पूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा आम्ही संपूर्ण शिवसेनेसह आम्ही येथे दर्शनासाठी आलो होतो, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आजचा अयोध्या दौरा हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी लक फॅक्टर ठरणार का अशी विचारणा केली असता आदित्य ठाकरे म्हणाले की, लक प्रत्येक ठिकाणी आवश्यक असते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो वा अन्य कुठली निवडणूक असो प्रत्येक दिवशी आव्हान तर असतेच. चांगले काम करायचं असेल आणि रामलल्लांचे आशीर्वाद असतील, तर रामराज्यही आणू शकतो, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.