Join us

शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येणार; पुन्हा भगवा फडकवणार- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 1:56 PM

भाजपा आणि शिंदे गटाचा विजय झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई- विधानसभेत भाजपा आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शाह फारूख अन्वर मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. 

भाजपा आणि शिंदे गटाचा विजय झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाचा व्हिप मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याच येईल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. बंडखोर जेव्हा लोकांना भेटतील तेव्हा पाहू, जनतेचा सामना कसा करातात पाहू, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलं होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. 

दरम्यान, भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्या पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी बसलो असतो. तसेच एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने मी उभा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

एकनाथ शिंदे यांची कारकीर्द यशस्वी होईलच, पण ती अधिक यशस्वी कशी होईल हा प्रयत्न मी करणार आहे. त्यांच्यात माझ्यात कधीही दुरावा, पॉवर स्ट्रगल, कुरघोडीचं राजकारण दिसणार नाही. कारण कधी आम्ही सोबत होतो, कधी वेगळ्या बाकांवर होतो आमच्यातली मैत्री कायम राहिली, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे