मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. भाजपाने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपाचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. त्यानंतर, शिवसेना नेतेही भाजपवर तुटून पडले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला.
ही मुंबई बाळासाहेब ठाकरेंची आहे, हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा आहे. हवेत तर तुम्ही लोकं आहात, तुम्हाला जमीन दाखवली पाहिजे, हे पाप करत आहेत पाप, अमित शहा हे हनुमान भक्त आहेत, आम्ही दोघांनी एकत्र पूजा केली होती, ते विसरले काय, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे. तसेच, मुंबईत आम्ही प्लॅनिंग केलं आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या १५१ जागा निवडून येणार, मी भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने सांगतो, असे भाकीतही खैरे यांनी केले.
"उद्धव ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही. शिवसेनाला कोणीच संपवू शकलं नाही, तुम्ही नष्ट व्हाल पण शिवसेना संपणार नाही. ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू. अमित शाह यांनीच शब्द फिरवला. शाह यांच्यासारख्या व्यक्तीने खोटं बोलणं चुकीचं" असे खैरे यांनी म्हटले.
मी बैठकीला उपस्थित होतो.
“मी त्या बैठकीला शिवसेना नेता म्हणून उपस्थित होतो. उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना बोलावलं होतं. एकेका पक्षाला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद असं त्यात ठरलं होतं. इतकं झाल्यानंतर अमित शाह उद्धव ठाकरेंना असं म्हणत असतील तर चिड येणारी बाब आहे,” असं खैरे म्हणाले. यावरून आता भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांना टोला लगावला आहे.
अंबादास दानवेंचाही निशाणा
देशाचे नेतृत्व करणाऱ्या अमित शहासारख्या केंद्रीय नेत्याला मुंबईत येऊन महापालिकेविषयी भूमिका घ्यावी लागते यातच शिवसेनेची ताकद लक्षात येते. महापालिका आम्ही मिळवणारच कारण सगळी महत्वाची केंद्र ते अहमदाबादला हलवत आहेत, मग मुंबई यांना हवी तरी कशाला अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट शहा यांच्यावर हल्ला चढवला.