पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 08:17 PM2018-04-23T20:17:24+5:302018-04-23T20:17:24+5:30
राज्यात, दिल्लीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा; देसाईंचं शिवसैनिकांना आवाहन
मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली होती. त्यात आता कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागून शिवसेनेचा भगवा दिल्लीवर आणि राज्यात फडकवायला सज्ज व्हा', असं आवाहन सुभाष देसाई यांनी काल रात्री गोरेगावात शिवसैनिकांना केलं.
शिवसेना गोरेगाव विधानसभा आणि गणेशगल्ली स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्यानं ज्येष्ठ शिवसैनिकांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोरेगाव पश्चिम येथील गणेश मैदानात झालेल्या या सोहळ्यात हजारो ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी उद्योगमंत्री बोलत होते. 'शिवसेनेच्या स्थापनेपासून कोणत्याही पदाची अपेक्षा न करता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिवसेना वाढवण्यासाठी वेचले, कसलीही पर्वा न करता अनेक आंदोलनात हिरहिरीने भाग घेतला, कुणाचाही आधार नसताना संकटांना तोंड दिले, अशा ज्येष्ठ शिवसैनिकांना शिवसेना कधीही विसरली नाही आणि यापुढेही विसरणार नाही,' अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांनी आतापासूनच निवडणुकांच्या तयारीला लागावं, असं आवाहन कीर्तिकर यांनी यावेळी केलं. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, महिला विभागसंघटक साधना माने, नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर, माजी नगरसेविका प्रमिला शिंदे, लोचना चव्हाण, माजी नगरसेवक राजू पाध्ये, राम म्हात्रे, अशोक पटेल, उपविभागप्रमुख दीपक सुर्वे, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, विभाग अधिकारी रोहन शिंदे, दिनेश राव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.