'बावन' असो किंवा एकशे बावन्न, तुमची कितीही 'कुळं' खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 07:28 PM2022-08-13T19:28:39+5:302022-08-13T19:30:22+5:30
'मार्मिक'च्या ६२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाच्या आठवणी ताज्या केल्या.
मुंबई-
'मार्मिक'च्या ६२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाच्या आठवणी ताज्या केल्या. हुकूमशाहाला आव्हान देऊन हुकूमशाही नष्ट करण्याची ताकद व्यंगचित्रकारामध्ये असते असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली आजच्या काळाशी सुसंगत असलेली काही व्यंगचित्र मुद्दाम दाखवली. उद्धव ठाकरेंनी या व्यंगचित्रांमधून भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसंच भाजपामध्ये नुकतंच झालेल्या खांदेपालटाच्या मुद्द्याला स्पर्श करत उद्धव ठाकरेंनी बावन असो किंवा मग एकशे बावन्न असो, तुमची कितीही कुळं खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही, असं म्हणत भाजपाला जोरदार टोला लगावला.
अस्वस्थ मनाच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करतो. व्यंगचित्रकारांच्या फटकाऱ्यांमधून समाजाला आणि देशाला दिशा मिळत आली आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवरही टीका केली.
"हर घर तिरंगा लावा, पण ज्यांच्याकडे घरच नाही तो तिरंगा लावणार कुठे? नुसतं बेंबीच्या देठापासून भारत माता की जय ओरडून चीन मागे जाणार आहे का? घराघरावर तिरंगा लावाच, पण तुमच्या हृदयात देखील तिरंगा हवा", असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी रेखाटलेलं एक व्यंगचित्र देखील उदाहरणादाखल सादर केलं. व्यंगचित्रात एक मुलगा त्याच्याकडे तिरंगा आहे, पण तो लावण्यासाठी घर नाही असं दाखवण्यात आलं होतं.
राज्यातील शिंदे सरकारवरही हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला. "महाराष्ट्रात सरकार आहे कुठं? मंत्र्यांना खातं नाही. त्यांचाच आझादीचा अमृत महोत्सव सुरू आहे. राज्यात अतिवृष्टीची गंभीर समस्या असताना मंत्र्यांकडून सत्कार स्वीकारले जात आहेत. जनतेला दिलासा देण्याचं काम कुठं सुरू आहे? या मुद्द्यांवर व्यंगचित्रकारांनी आपल्या ब्रशचे फटकारे मारले पाहिजेत", असं उद्धव ठाकरे म्हणाले.