शिवसेना टाकणार सहकार क्षेत्रात पहिले पाऊल
By admin | Published: February 18, 2015 12:45 AM2015-02-18T00:45:55+5:302015-02-18T00:45:55+5:30
शिवसेना आता सहकार क्षेत्रात पहिले पाऊल टाकणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे
मुंबई : शिवसेना आता सहकार क्षेत्रात पहिले पाऊल टाकणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. मे महिन्यात मुंबई बँकेच्या २१ संचालकांसाठी होणाऱ्या मंडळाची निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होत शिवसेनेने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. सहकार क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांना एकत्र आणण्यासाठी शिवसेनेने तरुण बिग्रेडवर ही जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेचे सहकार क्षेत्रातले पहिले पाऊल यशस्वी करण्यासाठी खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनील राऊत, माजी आमदार अभिजित अडसूळ, दहिसरचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश शिरवाडकर, मुंबई पूर्व उपनगर मजदूर सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे यांनी कंबर कसली आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत सर्व सहकारी संस्थांनी त्यांचे ठराव मुंबई बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवायचे आहेत. गेली पाच वर्षे घोटाळ्यांच्या आरोपामुळे गाजलेल्या मुंबई बँकेचा जनतेचा पैसा, ठेवी अबाधित ठेवून त्यांना दिलासा मिळण्यासाठी यंदा शिवसेनेने या निवडणुकीच्या निमित्ताने हे पाऊल टाकल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)