breaking news: शिवसेना भाजपासोबत सत्तेत राहणार, घटस्फोट वगैरे नुसतीच चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 04:50 PM2018-05-31T16:50:22+5:302018-05-31T17:06:59+5:30
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान भाजपा आणि शिवसेनेतील दरी वाढलीय, आता उद्धव ठाकरे काडीमोडाची घोषणा करणार, अशी हवा झाली असली, तरी त्यात काही तथ्य नसल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.
मुंबईः पालघर लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान भाजपा आणि शिवसेनेतील दरी वाढलीय, आता उद्धव ठाकरे काडीमोडाची घोषणा करणार, अशी हवा झाली असली, तरी त्यात काही तथ्य नसल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ही पालघर पोटनिवडणूक निकाल आणि त्यातील गौडबंगाल या विषयाबाबत असल्याचं एका शिवसेना नेत्यानं 'लोकमत'ला सांगितलं.
'तुझं माझं जमेना', असं म्हणत भाजपा आणि शिवसेना हे जुने मित्र भांडत-भांडत एकत्र नांदताहेत. सततच्या कुरघोडींमुळे त्यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत चाललीय. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात त्यांच्यातील हा तणाव प्रकर्षाने जाणवला. शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना आपल्यासोबत घेतलं, त्यानंतर प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं, भाजपावर पैसे वाटप, ईव्हीएम घोटाळा आणि इतर अनेक आरोप केले. त्याला भाजपानेही वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं आणि आज त्यांनी पालघर जिंकून दाखवलं. परंतु, हा भाजपाचा नाही तर निवडणूक आयोगाचा विजय आहे, अशी टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर फेरमतमोजणीची मागणीही ते करताहेत.
या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे पाच वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं शिवसेनेनं जाहीर केलं आणि भाजपा-सेना घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं. आता पुढे काय होईल, याची गणितही राजकीय विश्लेषकांनी मांडली. परंतु, काडीमोडाच्या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचा खुलासा शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'लोकमत'कडे केला आहे.