शिवसेना राहणार सत्तेतच; मंत्री मात्र बदलणार? उद्धव यांनी दिले संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:59 AM2017-09-27T05:59:15+5:302017-09-27T06:00:08+5:30
दस-याला सीमोल्लंघन करून सत्तेतून बाहेर पडण्याचे नगारे शिवसेनेने वाजविले असले तरी प्रत्यक्षात तो पक्ष सरकारमधून बाहेर पडणार नाही आणि सत्तेतच राहणार आहे, असे संकेत मंगळवारी ‘मातोश्री’वरील बैठकीतून मिळाले.
मुंबई : दस-याला सीमोल्लंघन करून सत्तेतून बाहेर पडण्याचे नगारे शिवसेनेने वाजविले असले तरी प्रत्यक्षात तो पक्ष सरकारमधून बाहेर पडणार नाही आणि सत्तेतच राहणार आहे, असे संकेत मंगळवारी ‘मातोश्री’वरील बैठकीतून मिळाले.
दसºयाच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणा-या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करतील, अशी चर्चा सुरू होती. विशेषत: महागाईविरोधात शिवसेनेने जे आंदोलन केले, ते पाहता शिवसेना आता सत्तेत राहणारच नाही, असे कार्यकर्त्यांना वाटू लागले होते. पण तसे घडण्याची आता तरी शक्यता दिसत नाही.
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मराठवाड्यातील अनेक आमदार आज मातोश्रीवर गेले होते. तेव्हा सरकारमध्ये राहायचे का नाही, याबाबत काय निर्णय घ्यायचा ते माझ्यावर सोडा. मात्र काही मंत्र्यांना बदलावे या आमदारांच्या भावनेबाबत मात्र मी योग्य वेळी निर्णय घेईन, असे उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आमदारांना सांगितले असल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात एकनाथ शिंदे नाहीत!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांच्या विदेश दौ-यावर रवाना झाले. गेल्या महिन्यात त्यांचा हा दौरा रद्द झाला होता. त्या वेळी शिवसेनेचे नेते सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत जाणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात केवळ अधिकाºयांचा समावेश आहे.
दसरा मेळाव्याची उत्सुकता
३० सप्टेंबरच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना घरी बसवून नव्यांना संधी देण्याबाबत काही भूमिका जाहीर करतात का, याबाबत उत्सुकता आहे.
मराठवाड्यातील शिवसेनेच्या नऊ आमदारांनी ठाकरे यांची भेट घेतली. बैठकीत आमदारांनी सध्याच्या पाचपैकी चार कॅबिनेट मंत्र्यांना बदलण्याची जोरदार मागणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एक राज्यमंत्री सोडले, तर मराठवाड्याला शिवसेनेने प्रतिनिधित्व दिलेले नाही, याकडे आमदारांनी लक्ष वेधले. ठाकरे यांना भेटलेल्या आमदारांमध्ये सध्या पक्षात नाराज असलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचाही समावेश होता.
सत्ता सोडण्याबाबत बैठकीत चर्चा झाली नाही. आमदारांनी कामे होत नसल्याचे सांगितले. त्यावर सेनेचे मंत्री व वरिष्ठांनी हे
प्रश्न सोडवावेत, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत.
- रामदास कदम