Join us  

वाढवण बंदर विरोधात शिवसेना कष्टकरी समाजाच्या मागे ठामपणे उभी राहणार

By मनोहर कुंभेजकर | Published: September 28, 2022 11:42 AM

आपले विचार योग्य असून आपण सांगितलेली भिती खरी आहे. एक इंडस्ट्रीज उध्वस्त करून दुसरी इंडस्ट्रीज कशाला उभी करता असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई-वाढवण बंदर विरोधी विविध संघटनांनी सोमवार  मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे  यांची भेट घेतली. किनारपट्टीवर व समुद्रात भरावामुळे पर्यावरण प्रश्न आहे, त्याच बरोबर सागरी जैविक  वैविधता,मत्स्य संवर्धन, मत्स्य प्रजनन क्षेत्र नष्ट होणार आहे. तसेच कफ-परेड मुंबई पासून ते झाई पालघर पर्यंत च्या किमान ७००० ते ७५०० मासेमारी नौका वरील व्यवसाय JNPT उध्वस्त करणार आहे. किमान ५,००,०००/- नागरिकांचा उदरनिर्वाह हिरावून घेणारा हा प्रकल्प आहे. एक मासेमारी इंडस्ट्रीज उध्वस्त करून कोणाचा सरकार विकास करणार आहे ? असा सवाल नॅशनल फिशवर्कर्स फोरम ( एनएफएफ ) व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (एमएमकेएस) यांनी केला.वाढवण बंदर विरोधात शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहिर केल्याबद्दल त्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. 

उध्दव ठाकरे म्हणाले की, आपले विचार योग्य असून आपण सांगितलेली भिती खरी आहे. एक इंडस्ट्रीज उध्वस्त करून दुसरी इंडस्ट्रीज कशाला उभी करता. पालघर/डहाणू मधील तरूण मंडळीचे विचार विचारात घ्या,तरूण पिढीला विश्वासात घ्या, वाढवण बंदराला बहुसंख्य कष्टकरी जनतेचा विरोध असेल तर वाढवण बंदर विरोधात, शिवसेना मच्छिमार, शेतकरी, आदिवासी इत्यादी कष्टकरी समाजा बरोबर काल देखील पाठिशी होती आणि आजही खंबीरपणे उभी राहील असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.

एमएमकेएसचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले की मत्स्य प्रजनन, संवर्धन व मासे मिळण्याचा गोल्डन बेल्ट आहे. वाढवण बंदर विकसित करण्याचे क्षेत्र पाहता जेवढी व्यापारी जहाजे उभी राहतील. तेवढीच वेटिंगला उभी राहतील. मासेमारीचे संपूर्ण क्षेत्र व्यापल्यावर मासेमारी करायची कुठे?असा सवाल त्यांनी केला.

एमएमकेएसचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने वाढवण बंदर व देशातील अन्य बंदरे विकसित करण्यासाठी व सागरमाला योजना देशातील मच्छिमारांवर लादण्यासाठी सीआरझेड २०१९ मच्छिमारांना विश्वासात न घेता लागू केला. आत्ता इंडियन पोर्टस बील २०२२ कायदा आणत आहेत. त्यामुळे समुद्र विकासकांचाच होईल. त्यांना पाहिजे तेव्हा  आणि पाहिजे तेव्हडे  क्षेत्र वाढवतील. ३८ वर्षा पूर्वी रायगड मधील शेवा कोळीवाडा गोड बोलून घेतला. आज पर्यंत त्यांचे पुनर्वसन झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना उपनेते व माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी सदर भेट घडवून दिली. सदर शिष्टमंडळात नारायण पाटील, अध्यक्ष, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, लिओ कोलासो,रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, रामदास संधे, म.राज्य.मच्छि.स.संघ, अध्यक्ष, जयकुमार भाय, ठाणे जि.मच्छि.स.संघ, अध्यक्ष,जगदीश नाईक, ठाणे जि.मच्छि.म.स.संघ, अशोक अंभिरे, अनिल चौधरी, मोरेश्र्वर पाटील, परशुराम मेहेर, भुवनेश्वर धनु, जयेश भोईर, रेखा पागघरे, दर्शना पागघरे, मानवेंद्र आरेकर, जयवंत तांडेल, विजय थाटू, वैभव भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरे