Join us

बेस्ट, सुधार समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 3:47 AM

बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रवीण शिंदे; सुधार समिती अध्यक्षपदी सदानंद परब

मुंबई : स्थायी समितीपाठोपाठ महत्त्वाच्या सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून ऐन वेळी काँग्रेसने माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला. भाजप उमेदवाराचा पराभव करीत सुधार समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे सदानंद परब, तसेच बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण शिंदे यांची निवड झाली.राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेवर असलेल्या काँग्रेसने महापालिकेत मात्र दंड थोपटले होते, परंतु निवडणुकीच्या दिवशी काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतल्याने चारही वैधानिक समित्यांचे अध्यक्षपद मिळविण्यात शिवसेनेला यश आले.सुधार समितीच्या मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सदानंद परब हे १३ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले, तर भाजपचे विनोद मिश्रा यांना नऊ मते मिळाली. काँग्रेसचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले.बेस्ट समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांना आठ मते मिळाली, तर भाजपचे प्रकाश गंगाधरे यांना पाच मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे सदस्य तटस्थ राहिले, तर दोन मत बाद ठरल्याने तीन मतांच्या फरकाने प्रवीण शिंदे यांचा विजय झाला.उमेदवारांनी गमावले स्वत:चे मतनिवडणुकीत सदस्यांना आपण कोणाला मतदान करत आहोत, हे जाहीर सांगावे लागते. त्यानंतर, त्या सदस्यांना आपल्या नावासमोर सही करावी लागते. सही नावासमोर न करता, इतर ठिकाणी केल्यास त्यांचे मत बाद केले जाते. बेस्ट समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी दुसºयाच नावासमोर सह्या केल्याने त्यांना स्वत:ची मतेही मिळवता आली नाहीत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनाभाजपा