बेस्ट संपातून शिवसेनेची माघार; नैतिक पाठिंबा काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:51 PM2019-01-08T20:51:47+5:302019-01-08T20:54:23+5:30
बेस्ट कामगार सेनेचे कर्मचारी उद्या कामावर हजर होणार; शिवसेना नेत्यांचा दावा
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपातून शिवसेनेनं माघार घेतली आहे. सत्ताधारी असल्यानं शिवसेनेची संघटना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊ शकत नव्हती. त्यामुळे शिवसेनेनं या संपाला नैतिक पाठिंबा दिला होता. मात्र हा नैतिक पाठिंबा शिवसेनेनं थोड्याच वेळापूर्वी काढून घेतल्याची माहिती मिळते आहे.
प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल चर्चा करण्यास तयार असल्यानं संपातून माघार घेत असल्याचं बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सामंत यांनी सांगितलं. 'प्रशासन आधी मागण्यांवर चर्चा करायला तयार नव्हतं. आता लवकरच सुधारित वेतन, बोनस आणि बेस्टचे महापालिकेत विलिनीकरणावर चर्चा करण्यास आयुक्त, महाव्यवस्थापक तयार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे अधिक हाल होऊ नये, यासाठी संपातून माघार घेण्याच निर्णय घेतला', अशी माहिती त्यांनी दिली. बेस्ट कामगार सेनेचे सभासद उद्या कामावर हजर होतील, असा दावा सेना नेत्यांनी केला आहे.
बेस्ट कामगारांनी आज संप पाळला. बहुतांश कामगार संपाच्या बाजूनं ठाम होते. मात्र सत्ताधारी असल्यानं शिवसेनेची संघटना संपात सहभागी झाली नाही. मात्र त्यांनी या संपाला नैतिक पाठिंबा दिला. गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगारांनी मागे घेतला होता. त्यामुळे पुन्हा संप होऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांची धावपळ सुरू होती. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. बेस्ट प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी एस.टी. महामंडळाला जादा गाड्या सोडण्यासाठी पत्र पाठवल्याची माहिती बेस्ट अधिकाऱ्यानं लोकमतला दिली. मात्र, बहुतांश कामगार संपात सहभागी झाल्यानं बससेवेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांचे अतिशय हाल झाले.