मुंबई - महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातील अतिक्रमणांवर केलेल्या कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. मनपाच्या कारवाईविरोधात शिवसेनेनं जी/दक्षिण विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. महानगरपालिकेनं केलेल्या कारवाईविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनपानं केलेल्या कारवाईविरोधात प्रभाग समिती अध्यक्ष किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले आहे.
दरम्यान, मनपानं केलेल्या कारवाईविरोधात प्रभाग समिती अध्यक्ष किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले आहे. महालक्ष्मी स्टेशनजवळील धोबीघाट मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण असून गेली 125 वर्ष हा धोबी अस्तित्वात आहे. धोबी घाट परिसरात कपडे धुण्यासाठी आणि छोट्या पायवाटा आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये या पायवाटांवर अतिक्रमणं आणि काही हौदांवर अनधिकृत बांधकामे झाली होती. याचबरोबर काही ठिकाणी अनधिकृत शेडदेखील उभारण्यात आले होते. दरम्यान, आतापर्यंत महापालिकेनं 63 अतिक्रमणांविरोधात कारवाई केली आहे.
अतिक्रमणांविरोधात केलेल्या कारवाईमुळे धोबीघाटावरील नागरिकांच्या बाजूनं शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. या परिसरातील धोब्यांचे 1 वर्षापूर्वी पुनर्वसन करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. पुनर्वसन न झाल्यानं ज्या ठिकाणी कपडे सुकवले जातात, त्या दोऱ्यांच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपाची शेड्स बांधण्यात आली होती. ती शेड्स पालिकेने तोडली आहेत. पालिका अधिकारी गरिबांविरोधात कारवाई करत असल्याचे सांगत पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात सोमवारी आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलनाचा इशारा नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्ष किशोरी पेडणेकर यांनी दिला होता.