Join us

किरीट सोमय्या नकोत, आम्ही मतं देणार नाही; शिवसैनिकांची 'मातोश्री'वर फिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 3:39 PM

किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा तीव्र विरोध

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा युती होणार की नाही, याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. भाजपा आणि शिवसेना नेमक्या किती जागांवर लढणार हे अद्याप ठरलेलं नाही. वरिष्ठ पातळीवर खलबतं सुरू आहेत. मात्र विधानसभेपासून शिवसेना, भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील कटुता वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी तर दोन्ही पक्ष इरेला पेटले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभांमधून एकमेकांवर जहरी टीका केली होती. निवडणुकीवेळी काढलेले हेच वाभाडे आता युतीच्या चर्चेतले अडथळे ठरत आहेत.युतीची चर्चा जोरात सुरू असताना शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे एक मागणी केली आहे. युती झाली तर ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या नको, असं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. किरीट सोमय्या यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात सोमय्यांबद्दल प्रचंड राग आहे. त्यामुळेच युती झाल्यास ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सोमय्या नको, अशी ठाम शिवसैनिकांनी घेतली आहे. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रचार करणार नाहीत. एकही शिवसैनिक त्यांना मत देणार नाही, असं शिवसैनिकांनी उद्धव यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार लढत झाली. त्यावेळी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. मुंबई महापालिकेत माफिया राज असून भाजपा ते उलथवून लावेल, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. यासाठी वांद्र्यातील माफिया जबाबदार असल्याचं विधानदेखील त्यांनी केलं होतं. त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे होता. तेव्हापासून शिवसैनिकांच्या मनात सोमय्यांबद्दल संतापाची भावना आहे. त्यामुळेच ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी देण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे.  

टॅग्स :किरीट सोमय्याउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपालोकसभा निवडणूक २०१९मुंबई महानगरपालिकानिवडणूक