Rahul Kanal urges BookMyShow: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणी थांबवण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट कामराविरुद्ध आक्रमक झाला आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेचे महासचिव राहुल कनाल यांनी कुणाल कामरासंदर्भात बुक माय शोला एक पत्र लिहीलं आहे. राहुल कानाल यांनी दोन दिवसांपूर्वीच कुणाल कामरा जेव्हाही महाराष्ट्रात येईल तेव्हा आम्ही त्याचे शिवसेना स्टाईलमध्ये स्वागत करु, असे म्हटले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या विडंबनात्मक गाण्यातून कुणाल कामरा याने टीका केली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली होती. याप्रकरणी शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेचे महासचिव राहुल कनाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता कनाल यांनी ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बुक माय शोला पत्र लिहीलं आहे. कुणाल कामरा याच्या पुढच्या शोची तिकीट उपलब्ध न करुन देण्याची पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. या पुढे कुणाल कामरा याचे शो आयोजित झाले तरीसुद्धा त्याची तिकिटे उपलब्ध न करुन देण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
"एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र बुक माय शोला लिहित आहे, जेणेकरून महत्त्वाच्या सार्वजनिक हिताच्या बाबीकडे आपले लक्ष वेधता येईल. माझ्या लक्षात आले आहे की बुक माय शोने यापूर्वी कुणाल कामरा या व्यक्तीच्या शोसाठी तिकीट विक्रीची सोय केली आहे, ज्याला गुन्हेगारी वर्तनाची सवय आहे. कामरा हा भारताचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सार्वजनिक व्यक्तींना लक्ष्य करून निंदा आणि बदनामीच्या सतत मोहिमेत गुंतलेले दिसतोय. कामरा यांच्या पूर्वनियोजित, स्क्रिप्टेड, प्रक्षोभक आणि दुर्भावनापूर्ण विधानांनी सातत्याने नैतिक आणि कायदेशीर सीमा ओलांडल्या आहेत. अशा टिप्पण्यांमुळे केवळ जनतेच्या भावना दुखावल्या जात नाहीत तर सामाजिक एकोपा बिघडवण्याचीही क्षमता असते," असं कनाल यांनी म्हटलं.
"कामराला परफॉर्म करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देऊन बुक माय शो अनवधानाने अशा व्यक्तीला संधी देत आहे ज्यांच्या कृतींमुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येते. बिग ट्री एंटरटेनमेंट आणि बुक माय शोने यापुढे तुमच्या प्लॅटफॉर्मवर कुणाल कामराचे शो प्रकाशित करणे किंवा त्याचा प्रचार करणे टाळावे अशी माझी मनापासून विनंती आहे. त्याच्या कार्यक्रमांसाठी तिकीट विक्रीची सुविधा चालू ठेवणे हे त्यांच्या फुटीरतावादी वक्तृत्वाचे समर्थन मानले जाऊ शकते, ज्यामुळे शहरातील सार्वजनिक भावना आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मला विश्वास आहे की बुक माय शो एक जबाबदार संस्था असून दर्शकांच्या आणि समुदायाच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे," असेही राहुल कनाल यांनी आपल्या पत्रात म्हटले.