नारायण जाधव, नवी मुंबईबेलापूरमधील विजयानंतर नवी मुंबईत भाजपाची ताकद वाढविण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जंगजंग पछाडले. अनेक कार्यकर्त्यांना शिवसेना, काँगे्रस आणि राष्ट्रवादीमधून पक्षात खेचून भाजपाची ताकद वाढविली. एवढेच नव्हे तर महापालिका निवडणुकीत युतीच्या जागा वाटपात भाजपाला जास्तीतजास्त जागा कशा मिळतील, याबाबत अखेरपर्यंत किल्ला लढवून ४३ जागा पदरात पाडून घेतल्या. या जागा गेल्या खेपेच्या १४ जागांपेक्षा २९ ने जास्त आहेत. मात्र, जागा वाटपात मंदा म्हात्रे यांच्या निष्ठावंतांचे बहुसंख्य प्रभाग शिवसेनेने आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. यामुळे ताई युद्धात जिंकल्या, अन् तहात हरल्या असे म्हणण्याची वेळ त्यांच्या समर्थकांवर आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी निष्ठावंतांपेक्षा आयाराम व त्यांच्या नातेवाइकांना तिकीट वाटपात प्राधान्य दिल्याने पक्षात प्रचंड असंतोष आहे. वाशीतील मध्यवर्ती कार्यालयात निष्ठावान शिवसैनिकांनी उपनेते विजय नाहटांसह पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून बंडाचे निशाण फडकावले आहे.बेलापूरमधील विजयानंतर आमदार म्हात्रेंसोबत तुर्भे विभागातील काँगे्रसच्या माजी नगरसेविका संगीता सुतार आणि सेवादलाचे अध्यक्ष असलेले त्यांचे पती जनार्दन सुतार यांनी काँगे्रस सोडून भाजपाचे कमळ हातात घेतले होते. त्यापाठोपाठ नेरूळ येथील काँगे्रसच्या माजी नगरसेविका वैशाली तिडके आणि शिक्षण मंडळाचे सदस्य असलेले त्यांचे पती दिलीप तिडके, वाशीतील काँगे्रसचे माजी नगरसेवक प्रकाश माटे तसेच सानपाड्यात विद्यमान नगरसेवक असलेले त्यांचे वडील शंकर माटे, तार्इंचे पूर्वाश्रमीचे पीए विकास सोरटे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. समर्थकांचे प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने आपण नाराज असून याबाबत प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. भाजपाची ताकद नवी मुंबईत वाढू नये याकरिता शिवसेनेने स्वपक्षात आलेल्या आयारामांसाठी हा खटाटोप केल्याचे एक भाजपा कार्यकर्त्याने सांगितले. शिवसेना नेत्यांनी भाजपाच नव्हे तर कट्टर शिवसैनिकांच्या पाठीतही खंजीर खुपसल्याचा आरोप केला. गेली २० वर्षे पक्षाच्या कट्टर समर्थक असलेल्या शिवसैनिकांना डावलून मातोश्रीने पक्षातील आयाराम आणि त्यांच्या नातेवाइकांना दोन ते तीन तिकिटे दिली आहेत. तसेच जागा वाटपातही अनेक हक्काचे प्रभाग भाजपाला सोडले आहेत.
शिवसेनेत आयारामांना पायघड्या
By admin | Published: April 07, 2015 5:16 AM