Ashish Shelar : भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 03:20 PM2021-12-12T15:20:04+5:302021-12-12T15:22:23+5:30
Ashish Shelar And Shivsena : शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालया समोरच लावले होते.
मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बद्दल अवमान करणारं आक्षेपार्ह वक्तव्यं भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केलं होतं. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद ही सध्या सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालया समोरच लावले होते. तसेच बॅनरवर आशिष शेलार यांचा एक फोटो असून त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टीकाही करण्यात आली.
"कसं काय शेलार बरं हाय का?, काल काय ऐकलं ते खरं हाय का?, काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला" असं बॅनरमध्ये म्हटलं आहे. वरळीतल्या घटनेनंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत स्वत: आशिष शेलार यांनी आपण आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ना कोणत्या महिलांबद्दल, ना महापौरांबद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे म्हटले आहे.
आशिष शेलार म्हणाले, "मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ना कोणत्या महिलांबद्दल, ना महापौर महोदयांबद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही. खोटे बोलणे आणि अपप्रचार ही भाजपची भूमिका नाही. जर कुठे तक्रार केली असेल तर त्यातून सत्यच समोर येईल."
याचबरोबर, आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना विनंती केली आहे. ते म्हणाले, "माझी मा. महापौरांना विनंती आहे की, मी जे बोललोच नाही, तेच तुमचेच समर्थक सोशल मीडियावर लिहित आहेत, पसरवत आहेत. या बदनामी पासून तुम्हीच आता वाचायला हवे", असे आमदार आशिष शेलार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.