इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:09 AM2021-02-06T04:09:48+5:302021-02-06T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी असतानाही भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी असतानाही भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या इंधन दरवाढीचा निषेध करीत शिवसेनेने शुक्रवारी मुंबईत निदर्शने केली.
मुंबईत शुक्रवारी शिवसेनेकडून इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला गेला. मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा, वडाळा, वांद्रे या भागांत मोठ्या संख्येने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भायखळा भागातील आंदोलनात महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीत बसून या आंदोलनात इंधन दरवाढीविरोधात निषेध व्यक्त केला; तर, दादरमध्ये भाजप कार्यालयासमोरच चूल मांडून निषेध व्यक्त केला.
परिवहन मंत्री अनिल परबही आंदोलनात सहभागी झाले होते. शुक्रवारी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. अन्याय झाला, मुस्कटदाबी होते तेव्हा सेना उफाळून उठते. शिवसेना मनमानी मान्य करणार नाही. शुक्रवारचा मोर्चा फक्त इशारा मोर्चा आहे. राज्य सरकार प्रश्न सोडवायला सक्षम आहे; पण केंद्र सरकार वरवंटा फिरवत आहे. कुणालाही न जुमानता दरवाढ करीत आहेत. वर्षाला एस.टी. चालवायला तीन हजार कोटींचे डिझेल लागते. या दरवाढीचे ओझे राज्य सरकार किंवा जनतेच्या खांद्यावर येते. यापुढची आंदोलने अजून तीव्र होतील, असे परब म्हणाले.
...........................