फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:59 PM2023-12-28T12:59:09+5:302023-12-28T13:00:37+5:30

सन २०२२-२३ या काळात राज्यात १ लाख ८३ हजार ९२४ कोटींची प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक झाली आहे.

Shiv Sena's arrow on Fadnavis' statistics; Credit to Uddhav Thackeray for increasing FDI by ambadas danve | फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान

फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान

मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेना उबाठा यांच्यातील वाद सर्वपरिचीत आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडत नाहीत. तर, महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यात पळवले जात आहेत असा आरोप विरोधकांकडून सातत्याने सरकारवर केला जातो. त्यावरही, फडणवीस आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात. नुकतेच, फडणवीस यांनी महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेने परदेशी गुंतवणूक सर्वाधिक असल्याचं सांगत थेट आकडेवारीच जाहीर केली आहे. फडणवीसांच्या या आकडेवारीवर शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकेचे बाण सोडले. 

सन २०२२-२३ या काळात राज्यात १ लाख ८३ हजार ९२४ कोटींची प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याबद्दल फडणवीसांनी सर्वांचं अभिनंदन केले आहे. तसेच, यावेळी फडणवीसांनी आकडेवारी जाहीर करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. त्यावर, अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील कार्यकाळाची आठवण करुन दिली. 

आपण ज्या कालखंडाची आकडेवारी इथे दिली आहे, त्या कालखंडात १५ महिने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात होते, हे पण लक्षात असू द्या. कोविड महामारीने उद्भवलेल्या अडचणींवर मात करून मविआच्या काळात (२०२१-२२ साली) १५,४३९ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक राज्यात आली. कोविड नसताना तुमची गाडी घसरली, आणि १४,१०६ मिलियन डॉलर्सवर आली, असेच हे आकडे बोलतात, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. 


महाराष्ट्रात आलेल्या गत तीन वर्षातील परकीय गुंतवणुकीतील सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडीच्या काळातील आहे. दुसऱ्याच्या श्रेयावर आपले नाव लिहिणे ही भाजपची जुनीच सवय आहे म्हणा! मग ते राम मंदिर असो वा महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक, असा टोलाही दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला. 

काय म्हणाले होते फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १,१८,४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक १ वर आला होता.२०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२३) या कालावधीत ३६,६३४ कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली. आता २०२३-२४ च्या दुसर्‍या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर २०२३) सुद्धा आकडेवारी आली असून यात २८,८६८ कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे असं त्यांनी सांगितले. तसेच, एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत एकूण ६५,५०२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे. एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ असा एकत्रित विचार केल्यास १,८३,९२४ कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आला आहे. सरकारची यशस्वी घौडदौड सुरू असून परदेशी गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे असं सांगत फडणवीसांनी सर्वांचे अभिनंदन केले. 
 

Web Title: Shiv Sena's arrow on Fadnavis' statistics; Credit to Uddhav Thackeray for increasing FDI by ambadas danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.